मतदारसंघातील लोक गरीब असून त्यांचा फायदा व्हावा, मतदारसंघाचा विकास करता यावा यासाठी भाजपमध्ये प्रवेश केल्याचा दावा एका आमदाराने केला आहे. “माझ्या मतदारसंघातील लोक गरीब असल्याने मी भाजपमध्ये आलो. माझा मतदारसंघ गरीब आहे, त्यामुळे त्यांच्या विकासासाठी मला सत्ताधारी पक्षासोबत मिळून काम करायचं आहे,” असं आसामच्या भबानीपूरचे आमदार पाणीधर तालुकदार यांनी म्हटलंय. तालुकदार यांनी आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा यांच्या उपस्थितीत बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला.
“माझ्या मतदारसंघातील लोक गरीब आहेत, मी कितीदिवस विरोधी पक्षात बसून राहणार. असंही मी आमदार असूनही विरोधी पक्षात असल्याने आतापर्यंत माझ्या मतदारसंघातील लोकांना त्याचा काहीच फायदा झालेला नाही. मी मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा यांच्यासोबत काम करण्यासाठी ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. मला ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटमध्ये कोणताच त्रास नव्हता, तसेच माझे त्यांच्याशी मतभेददेखील नाहीत. त्यांनीही भाजपसोबत येऊन सत्तेत सहभागी व्हावं, अशी माझी इच्छा आहे,” असं तालुकदार म्हणाले.
“राजकीय क्षेत्रातील नेत्यांचा पंतप्रधान मोदींवरचा विश्वास वाढतच आहे. तालुकदार यांचं मी आमच्या कुटंबात स्वागत करतो,” असं मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा म्हणाले.