UP च्या निवडणुकीत तालिबानचा मुद्दा गाजण्याची शक्यता; योगी म्हणाले, “मोदीजींचे आशीर्वाद असेपर्यंत…”

मोदी सत्तेत आहेत तोपर्यंत कोणतीही भारतविरोधी शक्ती काहीही हानी पोहचवू शकणार नाही असा विश्वास योगींनी व्यक्त केला.

yogi adityanath speech
एका सभेमध्ये भाषण देताना योगींनी केला उल्लेख (प्रातिनिधिक फोटो सौजन्य पीटीआय आणि रॉयटर्स)

योगी आदित्यनाथ यांनी काही महिन्यांमध्ये येऊ घातलेल्या उत्तर प्रदेश निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षावर निशाणा साधलाय. संबलमध्ये योगी आदित्यनाथांच्या हस्ते ६२ योजनांचं उद्घाटन करण्यात आलं. या प्रदेशामध्ये या योजनांच्या माध्यमातून २७५ कोटींची कामं केली जाणार आहे. याच कार्यक्रमात योगींनी या योजनांमध्ये पात्र ठरलेल्यांना प्रमाणपत्रांचं वाटपही केलं. यावेळी केलेल्या भाषणामध्ये योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पक्षाच्या नेत्यांवर टीका करताना तालिबानचा उल्लेख केलाय.

“संबल जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा आहे. मात्र त्याचवेळी येथील काही लोक तालिबानला पाठिंबा देत असल्याचं पाहून वाईट वाटतं. समाजवादी पक्ष हा महिलाविरोधी, दलितविरोधी, मागासविरोधी, हिंदूविरोधी, मुलांविरोधी पक्ष आहे. सर्वांना तालिबानने केलेल्या क्रूर अत्याचारांबद्दल ठाऊक आहे मात्र तरीही समाजवादी पक्षाच्या काही नेत्यांकडून त्यांना पाठिंबा दिला जातोय. भारताविरोधी कारवायांना पाठिंबा देणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल,” असं योगी यांनी म्हटलं आहे.

भाजपाने कायमच देशाचा विचार केल्याचं योगी यांनी यावेळी म्हटलं आहे. “असे अनेकजण आहेत जे भारतविरोधी शक्तींना आसरा देण्याआधी विचार करत नाहीत. मात्र सध्या (पंतप्रधान नरेंद्र) मोदीजींचे आशीर्वाद आहेत तोपर्यंत कोणीही काहीही करु शकणार नाही. उत्तर प्रदेशामध्ये दंगली घडणार नाहीत,” असं योगी म्हणाले.

२०१७ च्या पूर्वी राज्यामध्ये गायी सुरक्षित नव्हत्या असंही योगी म्हणाले आहेत. “बैलगाड्या आणि म्हशींचा वापर करुन वापरल्या जाणाऱ्या गाड्या आता दिसत नाहीत. मात्र आम्ही कत्तलखाने बंद केले आणि समाजवादी पक्षाचे तसेच काँग्रेसचे उद्योग बंद झाले,” अशी टीका योगी यांनी यावेळी केली.

“समाजवादी पक्ष हा महिला विरोधी, दलितविरोधी आणि मागास वर्गाविरोधी असण्याबरोबरच हिंदूविरोधी तसेच लहान मुलांच्या अधिकारांविरोधात असणारा पक्ष आहे,” असं योगी म्हणाले आहेत.

“आधी आपल्या बहिणींना, मुलींना शाळेतही जाता येत नव्हतं. तेव्हा गुंडगिरी करणारे या महिलांच्या प्रतिष्ठेसोबत खेळायचे. मात्र आज कोणी अशी हिंमत केली तर जे दुर्योधन आणि दुःशासनाच्या नशीबी आलं तेच त्यांच्या नशीबी येईल,” असंही योगी म्हणाले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: People in sambhal are extending support to the taliban says uttar pradesh chief minister yogi adityanath scsg