नितीश कुमार हे खूप मोठे संधीसाधू निघाल्याची सणसणीत टीका राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष (राजद) लालू प्रसाद यादव यांनी केली. नितीश कुमार यांनी गुरूवारी भाजपच्या पाठिंब्याने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर सर्व प्रसारमाध्यमांचे लक्ष लालू प्रसाद यादव काय बोलतात, याकडे लागले होते. यावेळी अपेक्षेप्रमाणे लालू यांनी बिहारमधील राजकीय परिस्थितीचे सर्व खापर नितीश कुमार यांच्यावरच फोडले. बिहारच्या जनतेने भाजपविरोधात जनमत देऊन मोदी-शहा जोडगोळीला राज्याबाहेरच ठेवले होते. पण आता नितीशकुमार यांनी स्वार्थासाठी भाजपशी हातमिळवणी केलीय. मी मातीत गेलो तरी भाजपशी हातमिळवणी करणार नाही, अशी नितीश यांची भाषा होती. मीदेखील त्यांना शंकरासारखं सर्वत्र राज्य कर, असा आशीर्वाद दिला होता. मात्र, नितीश हे भस्मासूर निघाले. ही मॅच फिक्स होती, आमचं काहीच चुकलेलं नाही, असे लालू प्रसाद यादव यांनी सांगितले.

यावेळी लालू प्रसाद यादव यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावरही तोंडसूख घेतले. अमित शहा सुपर एडिटर आहेत. ते चॅनेलच्या मालकांना कशाप्रकारे आणि कोणत्या बातम्या द्यायच्या हे सांगतात. आपल्याकडील प्रसारमाध्यमेही सरकारला प्रश्न विचारण्याऐवजी विरोधकांनाच लक्ष्य करतात. यामध्ये पत्रकारांचा दोष नाही, असे लालूंनी म्हटले.

तत्पूर्वी राजद आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी नितीश यांच्या निर्णयावर जोरदार टीका केली. नितीशकुमारांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाला संधी दिली गेली नाही. भाजपचा लोकशाहीवर याआधी कधीच विश्वास नव्हता आणि आजही नाही. भाजपच्या या कृत्याचा धिक्कार करतो, अशा शब्दांत दिग्विजय यांनी संताप व्यक्त केला. तर राहुल गांधी यांनी म्हटले की, नितीश यांनी बिहारमधील जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. यापूर्वी नितीश मला भेटले होते. मात्र, तेव्हा त्यांनी या निर्णयाबद्दल चकार शब्दही काढला नव्हता. मात्र, तरीही गेल्या तीन-चार महिन्यांपासून मला नितीश कुमार असे काहीतरी करणार, याची कुणकुण होतीच, असे राहुल यांनी सांगितले. बिहारच्या जनतेने जातीयवादी शक्तींविरोधात लढण्यासाठी नितीश कुमार यांना मते दिली होती. मात्र, वैयक्तिक राजकारणासाठी नितीश यांनी त्याच शक्तींशी हातमिळवणी केली , अशी टीका राहुल गांधींनी केली.