भारत आणि चीन या दोन देशांमधला तणाव चांगलाच वाढतो आहे. याला कारण आहे ते दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये झालेल्या चकमकीचं. भारताचे २० जवान शहीद झाले. त्यानंतर काँग्रेसने या मुद्द्यावरुन मोदी सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडलेली नाही. आज काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनीही सीमेवर जवानांना लढण्यासाठी शस्त्र न घेता का पाठवलं? याचं उत्तर देशाला हवं असल्याचं म्हटलं आहे. मोदींनी या प्रश्नाचं उत्तर द्यावं असंही त्या म्हणाल्या.

प्रियंका गांधी यांनी काय म्हटलं आहे?

“१५ जून रोजी चीन आणि भारत या दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये चकमक झाली. त्यावेळी आपले सैनिक सशस्त्र का नव्हते? आपल्या निःशस्त्र सैनिकांना चीन सैन्याचा सामना करण्यासाठी तुम्ही का पाठवलंत? या प्रश्नांची उत्तरं देशाला हवी आहेत. आपल्या देशाचे २० जवान शहीद झाले, ज्या ठिकाणी ही घटना घडली तो भारताचा भाग आहे. आम्ही तुम्हाला भारताचा भूभाग चीनला देऊ देणार नाही. तुम्हाला जे प्रश्न विचारलेत त्याची उत्तरं द्या”

याआधीही गलवान खोऱ्यातील संघर्षावरुन माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनीही सरकारवर आरोप केले आहेत. गलवान खोऱ्यात भारत आणि चीन यांच्यात जो संघर्ष झाला, त्यावरुन आज पुन्हा एकदा राहुल गांधी यांनीही त्यांच्यावर टीका केली. या प्रकरणात तुम्ही सत्य काय आहे सांगा? असं राहुल गांधी यांनी म्हटलंय.