भाजपाच्या दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर महावसुली आणि भ्रष्टाचारात सामी असल्याचा आरोप केला आहे. तसेच असे सरकार उखडून टाकून जनतेची सुटका करायची आहे, असे आवाहन त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांना रविवारी केले. जेपी नड्डा यांनी आपल्या कार्यकर्त्यांना महाविकास आघाडीचे सरकार उखडून टाका असा संदेश दिल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

“भाजपाची भूमिका मी समजू शकतो. महाराष्ट्रामध्ये प्रयत्न करुनही महाविकास आघाडी सरकारच्या केसालाही धक्का लावता आला नाही. केंद्रीय यंत्रणा हाताशी धरून दहशत, दबाव, पैसा वापरूनही सरकार पडत नसेल तर वैफल्य येणे स्वाभाविक आहे. जेपी नड्डा हे एक सद्गृहस्थ आहेत. त्यांनी महाविकास आघाडीचे सरकार उखडून फेका असे सांगितले आहे. त्याच्या आधी त्यांनी अरुणाचल प्रदेशमध्ये चीनने घुसखोरी केली आहे आणि गाव वसवलेले आहे आधी ते उखडून फेकले पाहिजे. जम्मू काश्मीरमध्ये अतिरेकी वाढले आहेत त्यांनी ताबडतोब उखडून फेकले पाहिजे. अरुणाचलमधून चीनला आणि काश्मीरमधून दशतवाद्यांना या दोघांना उघडून झाले की मग त्यांनी महाराष्ट्राकडे वळावे आणि जी काही राजकीय उखडबाजी करायची आहे ती करावी. लोकशाही मार्गाने एखादे सरकार हलवण्याचा अधिकार दुसऱ्या पक्षाला आहे. पण उखडण्याची भाषा करायची असेल तर ती सीमेवर चीनने गावे वसवली आहेत त्यांना उखडण्यासाठी तुम्हाला काही करता येत असेल तर देश त्याविषयी समजून घेण्यासाठी उस्तुक आहे,” अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

पंतप्रधान मोदी नोटबंदीच्या वेळी भष्ट्राचार, दहशतवाद कमी होईल असे म्हटले होते असे विचारल्यानंतर याबाबतही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “काश्मीरमध्ये सर्वात जास्त दहशतवाद वाढला आहे. सगळ्यात जास्त भ्रष्टाचार गेल्या पाच वर्षामध्ये वाढला आहे. त्यामुळे नोटबंदी पूर्णपणे अपयशी ठरली आहे. आर्थिकदृष्ट्या संकट आल्याने शेकडो लोकांना प्राण आणि नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. नोटबंदीच्या निर्यणाबद्दल केंद्र सरकारने देशाची माफी मागायला हवी,” असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.