PM Modi on Bihar Election Results 2025: बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने स्पष्ट बहुमत मिळवत मोठी आघाडी घेतली आहे. या निवडणुकीत काँग्रेस-आरजेडी आघाडीचा सपशेल पराभव झाला असून त्यांना ५० हून अधिक जागा जिंकता आलेल्या नाहीत. बिहारमधील ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील भाजपा मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना बिहारच्या विजयाचा उत्सव साजरा केला. बिहारमधील गंगा वाहत पुढे पश्चिम बंगालला जाते. आगामी काळात आम्ही पश्चिम बंगालमधील जंगलराज संपवू, असे सूचक विधान पंतप्रधान मोदींनी केले आहे.

आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच बिहारच्या दणदणीत विजयाबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, बिहारच्या प्रत्येक घरात आज मखान्याची खीर बनवली जाईल. निवडणुकीच्या निकालाने अशरक्षः विरोधकांचा सुपडा साफ केला आहे. हिंदीत याचे वर्णन करत असताना ते म्हणाले, “आज बिहार की जनता ने बिलकुल गर्दा उडा दिया…”

जनतेचे मन आम्ही चोरले

आम्ही जनतेच्या मनावर राज्य करतो. जनतेचे मन आम्ही चोरले आहे. बिहारच्या जनतेने दाखवून दिले, ‘फिर एक बार, एनडीए सरकार’. बिहारच्या प्रचारादरम्यान आम्ही जेव्हा जंगलराज आणि कट्टाराजची टीका करत होतो. तेव्हा आमच्यावर राजद नाही तर काँग्रेस पक्ष टीका करत होता. आता पुन्हा कधीही कट्टा सरकार येणार नाही, असेही प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

राजद आणि काँग्रेसच्या प्रचाराच्या मुद्द्यांवर टीका करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “लोखंड लोखंडाला कापते, अशी एक म्हण आहे. बिहारमध्ये याचा प्रत्यय आला. इथे काही पक्षांनी ध्रुवीकरण करणारे MY (मुस्लीम, यादव) फॉर्म्युला बनवला होता. मात्र आजच्या निकालाने नवा MY फॉर्म्युला दिला आहे. याचा अर्थ आहे महिला आणि युवा. बिहारच्या जनतेने महाआघाडीच्या माय फॉर्म्युलाला उध्वस्त केले आहे. मी बिहारच्या युवा, महिला, शेतकरी, कामगार, मच्छिमार सर्वांना नमन करतो.”

जामिनावर बाहेर असलेल्यांना जनतेने नाकारले

“हा फक्त एनडीएचा विजय नसून लोकशाहीचा विजय आहे. जामिनावर बाहेर असलेल्या लोकांना मतदार पाठिंबा देणार नाहीत, हे जनतेने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. भारत आता खऱ्या सामाजिक न्यायासाठी मतदान करत आहे. जिथे प्रत्येक कुटुंबाला सन्मान, समान संधी मिळत आहे. या भारतात ध्रुवीकरणाला कोणताही थारा नाही”, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.