मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या काळात राज्यात लुंगीवाले आणि टोपीवाल्या गुंडांचे दिवस गेले आहेत, असे वक्तव्य उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून काँग्रेस नेते राशीद अल्वी यांनी निशाणा साधलाय. तसेच लुंगी घालणारी प्रत्येक व्यक्ती गुन्हेगार नसते, असं म्हणत मौर्य यांना सुनावलं आहे.

अल्वी म्हणाले, “उत्तर प्रदेशातील निम्मी हिंदू लोकसंख्या लुंगी घालते. त्यामुळे मौर्य यांच्या वक्तव्याचा अर्थ सर्व लुंगी परिधान करणारे गुन्हेगार आहेत का,” असा प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर अल्वी यांनी भाजपावर हल्ला चढवत ते उत्तर प्रदेशच्या निवडणुका जिंकण्यासाठी विशिष्ट समुदायाला लक्ष्य करत असल्याचा आरोप केला. तसेच भाजपाची निवडणूक जिंकण्याची हुशारी जनतेला समजली असून त्यामुळे भाजपा घाबरल्याचंही अल्वी म्हणाले.

मौर्य काय म्हणाले होते?

भाजपाची सत्ता येण्यापूर्वी लुंगीवाले गुंड राज्यात मुक्तपणे फिरत होते आणि जाळीदार टोपी घातलेले लोक व्यापाऱ्यांना धमकावत त्यांच्या जमिनीवर अतिक्रमण करायचे, असे केशव प्रसाद मौर्य यांनी म्हटले होते. शुक्रवारी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी प्रयागराजमध्ये भाजपाने आयोजित केलेल्या व्यापारी परिषदेला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की “२०१७ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रयागराजमध्ये लुंगीछाप गुंड फिरत होते. डोक्यावर जाळीदार टोप्या घालून आणि शस्त्रे घेऊन ते व्यापार्‍यांना धमकावण्याकरिता वापरत असत. जमिनीचा ताबा घ्यायचे आणि तक्रार न करण्याची धमकी द्यायचे.”

“मात्र राज्यात भाजपाचे सरकार येताच टोपी आणि लुंगीच्या विळख्यातून व्यापाऱ्यांची सुटका झाली आहे. अन्यथा, सपा आणि बसपाच्या राजवटीत टोप्या आणि लुंगी घातलेले गुंड व्यापाऱ्यांना धमकावायचे आणि खंडणी वसूल करायचे. आज हे सर्व नाहीसे झाले आहे, कारण भाजपाने टोपी आणि लुंगीछाप गुंडांची दहशत संपवली आहे. व्यापारी व उद्योगपती यांचे उज्ज्वल भवितव्य भाजपाच्या पाठीशी असून व्यावसायिकांच्या बळावर भारतीय जनता पक्षाने २०१४ ते २०१९ पर्यंतच्या सर्व निवडणुका जिंकल्या आहेत,” असे केशव प्रसाद मौर्य म्हणाले होते.

हेही वाचा – “भाजपाने लुंगी आणि जाळीदार टोपीवाल्यांच्या दहशतीतून व्यापाऱ्यांची सुटका केली”; उत्तर प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचे वक्तव्य