Sajad Lone on separation Jammu & Kashmir: काश्मिरी नेता सज्जाद लोन यांनी जम्मूपासून वेगळे झाले पाहिजे, अशी मागणी केली आहे. ‘पीपल्स कॉन्फरन्स’ या राजकीय पक्षाचे अध्यक्ष लोन म्हणाले की, काश्मीर आणि जम्मू विभागांमधील प्रशासनिक व्यवस्थेचा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे. जम्मू आणि काश्मीर या दोन वेगळ्या प्रदेशांचे विभाजन करण्याची मागणी करणारे लोन हे काश्मीर खोऱ्यातील पहिले राजकीय नेते आहेत. काही भाजप समर्थकांनी स्वतंत्र जम्मू राज्याच्या मागणीला पुन्हा चालना दिल्यानंतर ही मागणी पुढे आली आहे.
काश्मिरी नेते सज्जाद यांनी बुधवारी विकास प्रकल्पांवरून मोठे आरोप केले. त्यावेळी ते म्हणाले, काश्मीरमधील विकासकामांना जम्मूमध्ये मोठा विरोध होत आहे. त्यामुळे आता दोन्ही प्रदेशांनी सामंजस्याने वेगळे होण्याची वेळ आली आहे. लोन हे बडगाम जिल्ह्यात नुकतेच घोषित करण्यात आलेले राष्ट्रीय विधी विद्यापीठ जम्मू प्रदेशात स्थलांतरित करण्याच्या आणि जम्मू प्रदेशाला काश्मीरपासून वेगळे करण्याच्या मागण्यांना उत्तर देत होते.
“सत्य उघडपणे स्वीकारणाऱ्या नेतृत्वाची गरज”
पत्रकार परिषदेत ‘पीपल्स कॉन्फरन्स’चे नेते सज्जाद लोन म्हणाले, “जम्मू आणि काश्मीर या विभागांनी सामंजस्याने वेगळे होण्याची वेळ आली आहे. हा फक्त विकासाचा मुद्दा राहिला नाही तर हा जम्मू-काश्मीरमध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर टीका करण्याची ही एक सर्वमान्य पद्धत बनली आहे. मला वाटतं की काश्मिरी लोक अशी वागणूक जास्त दिवस सहन करू शकत नाहीत. मला विश्वास आहे की काश्मीरमध्ये वेगळे होण्याची इच्छा आधीपेक्षा आता जास्त वाढली आहे. आता येथे सत्य उघडपणे स्वीकारणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे.”
जम्मूसाठी वेगळ्या राज्याची मागणी
गेल्या आठवड्यात, भाजपा आमदार शाम लाल शर्मा यांनी जम्मूसाठी स्वतंत्र राज्याची मागणी करून नवा वाद निर्माण केला. भाजपाने शाम लाल यांच्या विधानापासून स्वतःला दूर ठेवले असले तरी, त्यांच्या या मागणीमुळे जम्मूसाठी स्वतंत्र राज्याच्या मागणीला पुन्हा एकदा जोर आला आहे.
लोन जम्मूमधील नेतृत्त्वावर आरोप करत म्हणाले, जेव्हा केंद्राने त्यांच्याकडून सर्व काही हिसकावून घेतले, व्यवसाय दुसरीकडे वळवला आणि ‘दरबार प्रकल्प’ थांबवला, तेव्हा ते शांत राहिले. काश्मीर प्रदेशात ते आपलं शौर्य फक्त आपल्याच लोकांविरुद्ध दाखवतात”. याशिवाय, जम्मूच्या विकासाची इच्छा असल्यामुळेच इथे काश्मीर-केंद्रीत प्रकल्पांविरुद्ध काही भागांमध्ये आंदोलनं होत असल्याचं त्यांनी नमूद केलं.
