सीमावादावर कायमस्वरूपी तोडगा

गेल्या शतकभर जुन्या सीमावादावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याबाबत, तसेच वाहनांची आंतरराज्य वाहतूक सुरू करणे आणि आपापल्या पोलीस दलांना संघर्ष क्षेत्रापासून दूर ठेवणे यांसारखे उपाय योजण्याबाबत मिझोराम व आसाम सरकारांनी गुरुवारी सहमती दर्शवली.

आंतरराज्य सीमेवर २६ जुलैला झालेल्या संघर्षात आसाम पोलिसांचे ६ कर्मचारी व एक नागरिक ठार झाला होता, तर ५० जण जखमी झाले होते. या ठिकाणी परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी दोन्ही राज्यांच्या प्रतिनिधींची येथे बैठक झाली.

सीमेवर शांतता राखण्याबाबत दोन्ही बाजूंचे एकमत झाले आहे, असे आसामच्या प्रतिनिधी मंडलाचे नेतृत्व करणारे त्या राज्याचे सीमा क्षेत्र विकास मंत्री अतुल बोरा यांनी या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. मिझोरामला न जाण्याबाबत आपल्या नागरिकांसाठी जारी केलेली सूचनावली आसाम रद्द करेल, तसेच या दोन शेजारी राज्यांमधील वाहनांची वाहतूक पुन्हा सुरू करण्यासाठी उपाय योजेल, असेही ते म्हणाले.

आसामच्या बराक खोऱ्यात राष्ट्रीय महामार्ग क्र. ३०६ वर अनेक गटांनी ‘आर्थिक नाकेबंदी’ केल्यामुळे मिझोरामला होणारा जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा ठप्प झाला आहे. आसाम सरकारने मात्र अशा प्रकारची कुठलीही नाकेबंदी सध्या सुरू नसल्याचा दावा केला आहे.

‘वादग्रस्त भागांत तटस्थ दले तैनात करण्याचे दोन्ही बाजूंनी स्वागत केले आहे; तसेच अलीकडच्या काळात ज्या ठिकाणी दोन्ही बाजूंच्या पोलिसांमध्ये चकमकी झडल्या तेथे गस्त, टेहळणी किंवा नव्याने तैनातीसाठी आपापले पोलीस दल न पाठवण्याबाबत सहमती दर्शवली आहे’, असे दोन्ही राज्यांनी जारी केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे.

अतुल बोरा, त्यांच्या विभागाचे आयुक्त व सचिव जी.डी. त्रिपाठी, तसेच मिझोरामचे गृहमंत्री लालचाम्लिआना व गृहसचिव वनलालंगाथसाका यांच्या या संयुक्त निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.