पाकिस्तानचे माजी लष्कर प्रमुख आणि राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांचे आज दुबई मधील रुग्णालयात दिर्घ काळाच्या आजारानंतर निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. परवेज मुशर्रफ यांचा जन्म ११ ऑगस्ट १९४३ रोजी दिल्लीच्या दरियागंज याठिकाणी झाला होता. १९४७ रोजी भारताच्या फाळणीदरम्यान मुशर्रफ यांच्या कुटुंबाने पाकिस्तानात जाण्याचा निर्णय घेतला. ते कराची येथे स्थायिक झाले. त्यावेळी मुशर्रफ चार वर्षांचे होते. १९६१ साली मुशर्रफ पाकिस्तानी सैन्यात रुजू झाले. १९९९ साली मुशर्रफ यांनी तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांचे लोकशाही मार्गाने आलेले सरकारला उलथवून लावत सत्ता स्वतःच्या ताब्यात घेतली. २० जून २००१ ते १८ ऑगस्ट २००८ पर्यंत ते पाकिस्तानचे राष्ट्रपती होते.

कारगिल युद्धाचा कट रचला

एप्रिल ते जून १९९९ दरम्यान भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान कारगिल येथे युद्ध झाले. या युद्धाच्या वेळी परवेज मुशर्रफ चर्चेत आले. त्यावेळी ते पाकिस्तानचे लष्कर प्रमुख होते. सुरुवातीला कारगिल युद्धाची माहिती मुशर्रफ यांनी पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यापासूनही लपवून ठेवली होती. जिहादींच्या वेशात पाकिस्तानी सैन्यांनी सीमा ओलांडल्यानंतरही मुशर्रफ यांनी हे रहस्य कुणालाच सांगितले नाही. जेव्हा पाकिस्तानी सैन्य कारगिलच्या टोकावर पोहोचले, तेव्हा कुठे मुशर्रफ यांनी याची माहिती पंतप्रधानांना दिली. तरिही महत्त्वाचे तथ्य लपवून ठेवण्यात आले होते. जिहादींच्या वेषात सैन्यांना पाठविल्यानंतर भारतीय गुप्तचर यंत्रणांची दिशाभूल करण्यासाठी एलओसीच्या नजदीक रेडिओवर खोटे संदेश पाठविण्यात येत होते. हे संदेश बाल्टी आणि पश्तो भाषेमध्ये असायचे. त्यावेळी एलओसीवरील सर्वच दहशतवादी आणि पाकिस्तानी सैन्य याच दोन भाषांमध्ये संवाद साधायचे.

हे पहा >> Photos: दिल्लीत जन्म, धोनीच्या केसांची प्रशंसा आणि कारगिल युद्धाचे कारस्थान; परवेज मुशर्रफ यांची वादग्रस्त कारकिर्द

या संदेशावरुन कारगिलमध्ये जिहादी आणि दहशतवादी सक्रीय असल्याचा गैरसमज निर्माण करायचा, असा मुशर्रफ यांचा हेतू होता. जेणेकरुन भारत आणि जगाला ही पाकिस्तानी सैनिकांची कारवाई नाही, असा संदेश जाईल. पाकिस्तानी सैन्य दहशतवाद्यांच्या विरोधात असल्याचाही संदेशही रेडिओवर दिला जायचा, जेणेकरुन गैरसमज आणखी वाढेल. तसेच पाकिस्तानी माध्यमांनाही चुकीची माहिती देऊन मुशर्रफ यांनी पाकिस्तानी जनतेची दिशाभूल केली होती. मात्र त्यांचा हा डाव अनेक वर्षानंतर नवाज शरीफ यांनी लिहिलेल्या पुस्तकात उघड करण्यात आला. तसेच परवेज मुशर्रफ यांना सैन्याची जबाबदारी देऊन चूक केली, असेही नवाब शरीफ म्हणाले होते.

हुकूमशहा ते राष्ट्रद्रोही

मुशर्रफ यांनी तब्बल एक दशक पाकिस्तानवर हुकूमत गाजवली. मात्र २००९ साली त्यांच्यावर आणीबाणी लावल्यासंबंधी सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. त्याच वर्षी मुशर्रफ यांनी पाकिस्तानातून काढता पाय घेत इंग्लडमध्ये आश्रय घेतला. २०१३ साली सार्वत्रिक निवडणुकीकरिता ते पाकिस्तानात परतले असता त्यांच्यावर सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रद्रोहाचा खटला सुरु झाला. २०१६ साली न्यायालयाची परवानगी घेऊन उपचारासाठी मुशर्रफ दुबई येथे रवाना झाले. तेव्हापासून ते दुबईतच होते. मात्र विशेष न्यायालयाने त्यांना फरार घोषित केले. २०१९ साली सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रद्रोहाचा आरोपाखाली मुशर्रफ यांना फाशीची शिक्षा सुनावली.