scorecardresearch

देशाबाहेर जाण्याची परवानगी मिळताच मुशर्रफ दुबईत

लष्करशहा परवेझ मुशर्रफ हे सर्वोच्च न्यायालयाने परदेशात जाण्याची परवानगी देताच दुबईला रवाना झाले आहेत.

पाकिस्तानचे माजी अध्यक्ष व लष्करशहा परवेझ मुशर्रफ हे सर्वोच्च न्यायालयाने परदेशात जाण्याची परवानगी देताच दुबईला रवाना झाले आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतर सरकारनेही त्यांना परदेशात जाण्याची मुभा दिली होती. त्यांच्यावर देशद्रोहासह अनेक खटले असून अगोदर न्यायालयाने त्यांना देशाबाहेर जाण्यास परवानगी नाकारली होती. औषधोपचारासाठी परदेशात जाऊ द्यावे, अशी मागणी मुशर्रफ यांनी याचिकेत केली होती, ती बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली.
मुशर्रफ यांनी सांगितले, की पाकिस्तानवर माझे प्रेम आहे. काही आठवडे किंवा महिन्यातच आपण परत येऊ. सर्व खटल्यांना सामोरे जाण्याची माझी तयारी आहे. देशातील राजकारणात मी परत भूमिका पार पाडणार आहे. गुंतागुंत असलेल्या आजारावर औषधोपचारासाठी मी परदेशात जात आहे.
पहाटे ३.५५ वाजता मुशर्रफ हे एमिरेट्सच्या फ्लाइट ६११ मधून दुबईकडे रवाना झाले आहेत. त्या विमानात बसणारे ते शेवटचे प्रवासी होते. पहाटे पाच वाजता ते दुबईला पोहोचले. मुशर्रफ यांच्या ‘ऑल पाकिस्तान मुस्लीम लीग’चे नेते महंमद अमदग यांनी सांगितले, की मुशर्रफ हे देशात परत येतील, त्यांना देशाची सेवा करायची आहे.
अमजद यांनी दुबईत असे सागितले, की मुशर्रफ यांच्यावर अनेक डॉक्टर उपचार करणार आहेत. मुशर्रफ यांच्यावर २००८ च्या निवडणुकानंतर महाभियोगाची कारवाई सुरू करण्यात आली. ते २०१३ मध्ये पाकिस्तानात परत आले, तेव्हा त्यांच्यावर आणखी अनेक खटले दाखल करण्यात आले होते. मुशर्रफ यांच्या वकिलाने काल असे सांगितले, की ते सहा आठवडय़ांत परत येतील व सर्व खटल्यांना सामोरे जातील. मुशर्रफ यांना देशाबाहेर जाऊ देऊ नये ही सरकारची विनंती सिंध उच्च न्यायालयाने फेटाळली होती, त्यावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी शिक्कामोर्तब केले होते. मुशर्रफ यांनी २००७ मध्ये देशाची राज्यघटनाच रद्द केली होती, त्यामुळे त्यांच्यावर कलम ६ अन्वये देशद्रोहाचा खटला भरण्यात आलेला असून त्यात त्यांना फाशीची शिक्षा होऊ शकते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-03-2016 at 00:10 IST

संबंधित बातम्या