परवेझ मुशर्रफ यांचा उमेदवारी अर्ज फेटाळला

पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी तेथील संसदेची सार्वत्रिक निवडणूक लढविण्यासाठी दाखल केलेला उमेदवारी अर्ज शुक्रवारी फेटाळण्यात आला.

पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी तेथील संसदेची सार्वत्रिक निवडणूक लढविण्यासाठी दाखल केलेला उमेदवारी अर्ज शुक्रवारी फेटाळण्यात आला. पंजाब प्रांतातील कासूर मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी मुशर्रफ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, निवडणूक निर्णय अधिकारी मोहम्मद सलीम यांनी तो फेटाळला.
मुशर्रफ यांनी उमेदवारी अर्जावर केलेली स्वाक्षरी आणि त्यांच्या राष्ट्रीय ओळखपत्रावर असलेली स्वाक्षरी जुळत नसल्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात येत असल्याचे सलीम यांनी स्पष्ट केले. जावेद कसुरी नावाच्या वकिलानेही मुशर्रफ यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. मुशर्रफ यांनी पाकिस्तानी घटनेतील ६२ आणि ६३ व्या कलमांचा भंग केला असल्याचे कसुरी यांचे म्हणणे आहे. या कलमामध्ये संसदेची निवडणूक लढविणाऱया उमेदवाराचे चरित्र चांगले असले पाहिजे, असे नमूद केले आहे. येत्या ११ मे रोजी पाकिस्तानातील संसदेची निवडणूक होत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Pervez musharrafs nomination papers for pakistan polls rejected