पाळीव प्राण्याला देवाचे रूप देणे किंवा नटवणे हा धार्मिक भावना दुखावणारा गुन्हा ठरू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने दिला आहे. एका महिलेने जन्माष्टमीच्या दिवशी तिच्या पाळीव कुत्र्याला भगवान श्रीकृष्णाच्या वेशभूषेत सजवून त्याचे फोटो व्हॉट्सॲप स्टेटसवर ठेवले होते. याप्रकरणी दाखल झालेली एफआयआर न्यायालयाने पूर्णपणे रद्द केली आहे.
‘लाइव्ह लॉ’ने दिलेल्या वृत्तानुसार न्यायमूर्ती सुभाष मेहला यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. होशियारपूर येथील तलवाडा पोलीस ठाण्यात एका राजकीय पक्षाच्या युवा नेत्याने ३ सप्टेंबर २०२४ रोजी या महिलेविरोधात गुन्हा दाखल केला होता. महिलेने तिच्या कुत्र्याला पिवळे वस्त्र, मुकुट आणि दागिने घालून श्रीकृष्णाचे रूप दिले, ज्यामुळे हिंदू समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या, असा आरोप तक्रारदाराने केला होता.
भारतीय न्याय संहितेचे कलम २९८ आणि न्यायालयाचे स्पष्टीकरण
न्यायालयाने स्पष्ट केले की, भारतीय न्याय संहिता, २०२३ (BNS) च्या कलम २९८ अंतर्गत गुन्हा तेव्हाच सिद्ध होतो, जेव्हा एखाद्याची धार्मिक भावना दुखावण्याचा ‘दुर्भावनापूर्ण हेतू’ स्पष्ट असतो. या प्रकरणात महिलेचा कोणताही चुकीचा हेतू नव्हता. तिने केवळ तिच्या पाळीव प्राण्यावरील प्रेम आणि श्रीकृष्णावरील भक्तीपोटी हे केले होते.
न्यायालयाने दिला भगवद्गीतेचा आणि महाभारताचा दाखला
उच्च न्यायालयाने हा खटला निकाली काढताना अभ्यासपूर्ण आणि आध्यात्मिक दाखले दिले. भगवद्गीता अध्याय ५, श्लोक १८: न्यायालयाने सांगितले की, ज्ञानी व्यक्ती ही ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडाल या सर्वांमध्ये एकाच परमात्म्याचे रूप पाहते. त्यामुळे कुत्र्याला देवाची ‘अपवित्र रचना’ मानणे ही संकुचित विचारसरणी आहे. महाभारताच्या महाप्रस्थानिक पर्वात युधिष्ठिरासोबत स्वर्गाच्या दारापर्यंत गेलेल्या कुत्र्याचा आणि भगवान कालभैरवांचे वाहन असलेल्या श्वानाचा उल्लेख न्यायालयाने केला.
“ज्या पाळीव प्राण्याला ती महिला आपल्या मुलाप्रमाणे सांभाळते आणि प्रेम करते, त्याला जन्माष्टमीला कृष्णाचे रूप देणे हे तिच्या भक्तीचे आणि प्रेमाचे स्वाभाविक रूप आहे, कोणताही गुन्हा नाही.” – पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालय
न्यायालयाने स्पष्ट केले की, ही कृती धार्मिक भावना दुखावण्यासाठी नसून, देवाप्रती श्रद्धा, प्रेम आणि भक्ती व्यक्त करण्याचा एक भाग होती. त्यामुळे न्यायालयाने या प्रकरणी सुरू असलेली सर्व गुन्हेगारी कारवाई आणि एफआयआर रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.
