पीटीआय, नवी दिल्ली
कोल्हापूर येथील नांदणी मठात परतलेल्या माधुरी हत्तीणीचे पुनर्वसनाच्या दृष्टीने जामनगरमधील वनतारात पुन्हा स्थलांतर करण्यासाठी तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी ‘पेटा इंडिया’ने सर्वोच्च न्यायालयाला केली आहे. माधुरी हत्तीण ११ ते १२ सप्टेंबर रोजी कोल्हापूर येथे परतली, तेव्हा तिला मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी, कर्णकर्कश घोषणा, ढोलताशांचा आवाजाला सामोरे जावे लागले. आता ती साखळदंडात जखडलेल्या एकाकी कैद्याप्रमाणे जीवन जगते आहे, असा आरोप ‘पेटा इंडिया’ने केला आहे. तत्पूर्वी ती वनतारामध्ये आपल्या मैत्रीण शांतीबरोबर मुक्त विहाराचा आनंद घेत होती. मात्र आता एका शेडमध्ये ती एकाकी आहे. तिच्या दीर्घकालीन स्वास्थ्यासाठी हे ठिकाण अयोग्य असल्याचा निष्कर्ष तज्ज्ञांनी यापूर्वीच दिला आहे, असेही संस्थेच्या धोरण विभागाच्या उपाध्यक्ष खुशबू गुप्ता यांनी म्हटले आहे.
३३ वर्षे मठात एकाकी जीवन घालवल्यानंतर पायांना झालेली दुखापत, गुडघ्यांची सूज यामुळे माधुरीला मिरवणुकांमधून डांबरी रस्त्यांवर चालणे आणि कठीण पृष्ठभागावर दीर्घकाळ उभे राहणे असह्य झाले होते. या पार्श्वभूमीवर तिची रवानगी वनतारामध्ये करण्यात आली होती. ‘पेटा इंडिया’च्या अर्जात माधुरीला पुन्हा मठात हलवणे हे मुंबई उच्च न्यायालयाच्या १६ जुलै २०२५ रोजीच्या आदेशाचे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या २८ जुलै २०२५ रोजीच्या आदेशाचे उल्लंघन असल्याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.
