Pete Hegseth issues ultimatum to Iran: अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी इराणला कडक शब्दात इशारा दिला आहे. “इराण आपल्या नागरिकांच्या आणि जगाच्या भल्यासाठी शहाणपणाने एखादा करार निवडत नाही, तोपर्यंत इराणी नाकेबंदी आणि आर्थिक निर्बंध कायम राहतील”, असा इशारा हेगसेथ यांनी दिला. तसेच, ‘इराण निर्णय घेण्यात चुकले तर त्यांच्यावर नाकेबंदी आणि पायाभूत सुविधा व ऊर्जा केंद्रावर बॉम्बहल्ले होत राहतील’, असाही सूचक इशारा हेगसेथ यांनी दिला.

होर्मुझची नाकेबंदी यशस्वी

अमेरिकेने होर्मुझ सामुद्रधुनीत सुरु केलेल्या नाकेबंदीला आज तीन दिवस पूर्ण होत आहेत. अमेरिकेची नाकेबंदी भेदण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनेक जहाजांना अमेरिकेचे नौदलाने माघारी धाडण्याचे काम केले आहे. यामुळे होर्मुझ सामुद्रधुनीत प्रवेश करणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या जहाजांवर अमेरिकेच्या नौदलाने पूर्ण नियंत्रण मिळवल्याचा दावा अमेरिकडून केला जात आहे. नाकेबंदीमुळे इराणच्या आर्थिक आणि व्यापारी धोरणांना मोठा फटका बसला आहे. यामाध्यमातून अमेरिका इराणवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे संबंध अधिकच नाजूक झाले आहेत.

हेगसेथ यांचा इराणला इशारा

पेंटागॉन येथे माहिती देत असताना पीट हेगसेथ यांनी इराण संघर्षावर अपडेट दिली. यावेळी अमेरिकी लष्करी अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. “तुम्ही कोणती लष्करी मालमत्ता कुठे हलवली आहे, हे आम्हाला माहीत आहे,” असे ते इराणी सैन्य आणि इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स या दोघांनाही इशारा देताना हेगसेथ म्हणाले. “इराणचे अनेक ऊर्जा प्रकल्पांवर अजुनही हल्ला होण्याचे सावट गडद आहे. औद्योगिक सुविधांना अद्याप लक्ष्य करण्यात आलेले नाही. पण, नाकेबंदीमुळे इराणचा तेलातून मिळणारा महसूल बंद झाला आहे”, असे हेगसेथ म्हणाले.

…तर बॉम्ब हल्ले

“जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ आम्ही ही नाकेबंदी करु. इराणने अयोग्य निर्णय घेतला तर आमच्याकडे नाकेबंदीचा पर्याय आहेच शिवाय इराणच्या पायभूत सुविधा आणि ऊर्जा प्रकल्पांवर बॉम्बचा वर्षाव केला जाईल. अमेरिका इराणवर आर्थिक दबाव निर्माण करुन तो वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे”, असे पीट हेगसेथ यावेळी बोलताना म्हणाले. “होर्मुझ सामुद्रधुनीत प्रवेश करणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या सर्व जहाजांच्या हालचालीवर आमचे लक्ष आहे. यासाठी अमेरिकी नौदलाच्या क्षमतेच्या केवळ १० टक्के उपयोग केला जात आहे, असे हेगसेथ म्हणाले. इराणकडे आता नौदलच शिल्लक नसल्याचा दावा देखील त्यांनी यावेळी केला. नागरिकांच्या भल्यासाठी इराण योग्य निर्णय घेईल”, अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केली.