US Pentagon Chief Pete Hegseth on Operation Epic Fury : इराणने गेल्या अनेक वर्षांपासून जगभरातील अमेरिकन सैन्य आणि हितसंबंधांना लक्ष्य केले आहे, त्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिका आणि इस्रायलने इराणविरोधात कारवाई केली आहे. २८ जानेवारीपासून अमेरिका आणि इस्रायलने संयक्तपणे इराणवर हल्ले चढवले. मात्र, हे हल्ले करण्यामागे इराणचे वेळकाढू धोरण असल्याची टीका अमेरिकेने केली आहे. त्यामुळे, “आम्ही हे युद्ध सुरू केले नाही, परंतु राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ते संपवू”, असं विधान अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी सोमवारी केलं.

हा सत्तापालटाचा संघर्ष नाही

शनिवारपासून सुरू झालेल्या या लष्करी कारवाईनंतर प्रशासनाने पहिल्यांदाच जाहीरपणे पत्रकारांशी संवाद साधला. या संघर्षात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांचा मृत्यू झाला असून, मध्यपूर्वेतील इतर देशही या युद्धात ओढले गेले आहेत. कुवेतमध्ये या संघर्षात आतापर्यंत चार अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाला आहे. “हा ‘सत्तापालट’ करण्यासाठी केलेला संघर्ष नाही, पण इराणची सत्ता नक्कीच बदलली आहे आणि जग आता अधिक सुरक्षित आहे,” असेही हेगसेथ यांनी नमूद केले.

युद्धाचा शेवट आम्ही करू

“आम्ही हे युद्ध सुरू केले नाही, परंतु राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ते संपवणार आहोत. अमेरिकन नागरिकांविरुद्ध त्यांनी पुकारलेल्या युद्धाचा बदला आता आम्ही घेत आहोत. इराणच्या ४७ वर्षांच्या उद्दामपणाला चाप लावण्यासाठी ४७ व्या राष्ट्राध्यक्षांची (डोनाल्ड ट्रम्प) गरज भासली, ज्यांनी नेहमीच ‘अमेरिका फर्स्ट’ला प्राध्यान्य दिले आहे,” अशा शब्दांत अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी इराणला इशारा दिला. हेगसेथ यांनी पुढे अत्यंत कठोर शब्दात बजावले की, “जर तुम्ही अमेरिकन नागरिकांना मारले, किंवा पृथ्वीवर कुठेही त्यांना धोका निर्माण केला, तर आम्ही कोणतीही माफी न मागता आणि कोणताही संकोच न करता तुमचा शोध घेऊ आणि तुम्हाला ठार मारू.”

आमची उद्दीष्ट्ये ठरलेली आहेत

‘ऑपरेशन एपिक फ्युरी’चे ध्येय लेझरसारखे अचूक आणि केंद्रित आहे. इराणची आक्रमक क्षेपणास्त्रे नष्ट करणे, त्यांच्या क्षेपणास्त्र उत्पादनाचा नायनाट करणे, त्यांचे नौदल आणि इतर सुरक्षा पायाभूत सुविधा उद्ध्वस्त करणे. जेणेकरून त्यांच्याकडे कधीही अण्वस्त्रे नसतील. आम्ही त्यांच्यावर अत्यंत अचूकपणे, जबरदस्त आणि कोणताही संकोच न बाळगता प्रहार करत आहोत. प्रत्येक सरत्या दिवसासोबत आमची क्षमता अधिक शक्तिशाली होत आहे आणि इराण कमकुवत होत आहे. या युद्धाच्या अटी आम्ही निश्चित केल्या आहेत. आमच्या महत्त्वाकांक्षा काल्पनिक नाहीत; त्या वास्तववादी आहेत. जनतेबद्दल बोलायचे झाले तर, आम्हाला आशा आहे की इराणची जनता या सुवर्णसंधीचा फायदा घेईल. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे, आता वेळ तुमची आहे, असंही हेगसेथ म्हणाले.

इराणने केवळ विनाशच पसरवला

“आज, त्यांच्या हताशपणामुळे शत्रूचा खरा चेहरा उघड झाला आहे; इराणची क्षेपणास्त्रे आणि ड्रोन त्यांच्या शेजारील देशांतील हॉटेल्स, विमानतळ, अपार्टमेंट्स आणि इतर नागरी लक्ष्यांवर अंदाधुंदपणे कोसळत आहेत. दशकांपासून भ्याड दहशतवादी कारवायांमध्ये गुंतलेल्या राजवटीकडून आलेल्या या भ्याड युक्त्या आजही केवळ मृत्यू आणि विनाशच पसरवत आहेत”, असं हेगसेथ म्हणाले.

“इराणच्या नेतृत्वाने दहशतवादी गट, क्षेपणास्त्रे, ड्रोन आणि खोलवर गाडलेले अण्वस्त्र कारखाने व सुविधांशिवाय काहीही निर्माण केलेले नाही. गेल्या जूनमध्ये, ‘ऑपरेशन मिडनाईट हॅमर’ने त्यांच्या अण्वस्त्र कार्यक्रमाची पूर्णपणे राखरांगोळी केली. त्यानंतर, आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगितले होते की, आता बस झाले, आता करार करा. त्यांनी अहंकाराने नकार दिला. आम्ही त्यांना आधी इशारा दिला होता की यावेळी परिस्थिती अधिक भीषण असेल. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, सचिव रुबिओ त्यांनी खऱ्या मुत्सद्देगिरीसाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले, शांततेचा मार्ग वारंवार खुला करून दिला. त्यांनी शांततेसाठी प्रामाणिकपणे वारंवार प्रयत्न केले. शांततापूर्ण आणि समंजस करार करण्याची प्रत्येक संधी होती. पण तेहरान वाटाघाटी करत नव्हते. ते केवळ वेळकाढूपणा करत होते. त्यांचा उद्देश आपल्या क्षेपणास्त्रांचा साठा पुन्हा भरण्यासाठी आणि त्यांच्या अण्वस्त्र महत्त्वाकांक्षेला पुन्हा सुरुवात करण्यासाठी वेळ विकत घेणे हा होता. त्यांचे ध्येय आपल्याला ओलीस धरून ठेवणे आणि आपल्या सैन्यावर हल्ला करण्याची धमकी देणे हे होते. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प असले खेळ खेळत नाहीत”, असंही त्यांनी स्पष्ट केलं.