नवी दिल्ली : चित्र, शिल्प व छायाचित्र अशा विविध प्रदर्शनांसाठी भारतीय कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणार्या नवी दिल्लीतील प्रसिद्ध नेचर मॉर्ट कलादालनाचे संस्थापक आणि अमेरिकन कलाकार पीटर नेगी (वय ६७) यांचे दीर्घ आजारानंतर मंगळवारी रात्री निधन झाले.
भारतात येण्यापूर्वी नेगी यांनी कलाकार अलन बेलचर यांच्याबरोबर मिळून न्यूयॉर्कच्या ‘ईस्ट व्हिलेज’मध्ये १९८२मध्ये ‘गॅलरी नेचर मोर्ट’ हे कलादालन सुरू केले होते. मात्र १९८८मध्ये ते बंद करावे लागले. त्यानंतर १९९२ मध्ये अमेरिकेतून भारतात वास्तव्यास आलेल्या नेगी यांनी १९९७ मध्ये नवी दिल्लीत ‘नेचर मॉर्ट’ कलादालन सुरू केले. कला आणि कलाकारांना सर्वोच्च प्राधान्य देणार्या नेगी यांनी सतत नवकल्पनांना प्रोत्साहन दिले. कलादालनात पहिले छायाचित्र प्रदर्शन आयोजित करून त्यांनी सुरुवातीलाच त्याचा दाखला दिला होता.
ठुकराल आणि टोग्रा या कलाकारद्वयींना त्यांच्या उमेदीच्या काळात प्रदर्शनासाठी प्रोत्साहन देताना नगी म्हणाले होते, ‘तुम्हाला प्रदर्शनासाठी कलादालन जाळायचे आहे, तर जाळून टाका. आता ती तुमची जागा आहे आणि तो तुमचा कार्यक्रम आहे.’ असे कलास्वातंत्र्य जपणार्या नेगी यांच्या कलादालनाने अनेक वास्तु बदलल्या, पण त्याची लोकप्रियता कायम राहिली. बोस कृष्णमाचारी, ठुकराल आणि टोग्रा, छायाचित्रकार दयानिता सिंह यांच्यासह जगभरातील कलाकारांनी त्यांना आदरांजली वाहिली.
निर्भय आणि मुक्त जीवन! ‘नेचर मॉर्ट’ने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात नेगी यांच्या गुणांची प्रशंसा केली आहे. ‘‘त्यांना हवे तसे जीवन ते जगले – निर्भय, कोणाचीही तमा न बाळगता आणि अतिशय मुक्तपणे. रूढी-परंपरांसाठी त्यांच्याकडे अजिबात संयम नव्हता, त्याचवेळी त्यांना आवडणारे कलाकार आणि लोक यांच्या कल्पनांसाठी ते हवा तितका धीर धरत. त्यांनी कलाजगत अधिक आव्हान देणारे, अधिक उदार आणि अधिक रोचक केले.’’ इतर कोणीही या कलाकारांवर विश्वास ठेवण्यापूर्वी नेगी यांचा त्यांच्यावर विश्वास होता, असे गॅलरीच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. आपल्या मृत्यूनंतर शोक पाळताना गॅलरी बंद ठेवू नये, अशा सूचनाही त्यांनी दिल्या होत्या.
