केंद्र आणि राज्य शासनाने इंधनाच्या दरात कपात केल्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला होता. डिझेलच्या दरांमध्ये शनिवारी आणखी काही पैशांची घट झाली, मात्र करकपात झाल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून पेट्रोलच्या दरात वाढ सुरू झाली आहे. राजधानी दिल्लीमध्ये प्रति लिटर १४ पैशांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ झाली आहे. तर मुंबईमध्ये पेट्रोल प्रति लिटर १४ पैशांनी तर डिझेलचे दर प्रति लिटर ३१ पैशांनी वाढले आहेत. मुंबईमध्ये आता पेट्रोल प्रति लिटर ८७.२९ रूपयांनी मिळणार आहे. तर डिझेल ७७.०६ रूपये प्रति लिटर मिळेल.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये पाच रुपयांची घट होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, शुक्रवारी प्रत्यक्षात पेट्रोलच्या दरामध्ये ४.३६ रुपयांनी, तर डिझेलच्या दरामध्ये केवळ २.५९ रुपयांची कपात करण्यात आली. २०१४ मध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर ६० रुपयांच्या आसपास होता. २०१७ मध्ये तो ८० रुपयांच्या पुढे गेला आहे.

 

मागील महिनाभराचा विचार केल्यास एकाच महिन्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर पाच ते सहा रुपयांनी वाढले होते. त्यामुळे सर्वच नागरिकांसह वाहतूकदारांनाही त्याची झळ बसत होती. यंदाच्या मे महिन्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांचा पहिला उच्चांक नोंदविला गेला होता. या कालावधीत पेट्रोल ८६ रुपयांपर्यंत, तर डिझेलचा दर ७२.५० रुपयांपुढे पोहोचला होता. मात्र, सप्टेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात पेट्रोलच्या दराने नव्वदी ओलांडून सर्वच उच्चांक मोडीत काढले होते.

करकपातीमुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळून पेट्रोलचे दर नव्वदीच्या खाली उतरले आहेत. डिझेलच्या दरात शनिवारी  ७० पैशांचा दिलासा मिळाला. मात्र डिझेलसह पेट्रोलच्या दरांत रविवारी पुन्हा काही पैशांनी वाढ झाली आहे.