नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेल यांचे दर रविवारी पुन्हा वाढवण्यात आल्यामुळे, स्वयंचलित पेट्रोल-डिझेल हे हवाई इंधनापेक्षा ३० टक्क्यांनी महाग झाले आहे.पेट्रोल-डिझेलच्या दरांत सलग चौथ्या दिवशी लिटरमागे ३५ पैशांची वाढ झाल्यामुळे देशभरात हे दर विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. मुंबईत प्रति लिटर पेट्रोलसाठी १११.७७ रुपये मोजावे लागत असून, दिल्लीतही हे दर आजवरचे सर्वाधिक, म्हणजे १०५.८४ रुपये इतके झाले आहेत. मुंबईत डिझेलचे दर प्रति लिटर १०२.५२ रुपये असून, दिल्लीत ९४.५७ रुपये आहेत.

हवाई इंधन (एव्हिएशन टर्बाईन फ्युएल- एटीएफ) ज्या दरांत विमान वाहतूक कंपन्यांना विकले जाते, त्यापेक्षा दुचाकी आणि मोटारींमध्ये वापरल्या जाणाऱ्या पेट्रोलचे दर आता ३३ टक्क्यांनी अधिक आहेत. दिल्लीत ‘एटीएफ’चे दर एका लिटरला ७९ रुपये इतके आहेत. देशभरातील सर्वात महाग इंधन राजस्थानमधील गंगानगर या सीमेवरील शहरात मिळत असून, तेथे पेट्रोलचे दर लिटरला ११७.८६ रुपये, तर डिझेलचे दर १०५.९५ रुपये आहेत.