Petrol Diesel Price Hike: देशात व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची शुक्रवारी वाढ करण्यात आली. यानंतर आता सर्वसामान्य नागरिकांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. “पेट्रोल, डिझेल आणि घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ करण्याचा सरकार विचार करत आहे”, अशी माहिती सरकारी सूत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे. पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जागतिक कच्च्या तेलाच्या किमती वाढत असल्याने सरकार दरवाढ विचाराधीन असल्याचे सांगितले जात आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ४-५ रुपयांची वाढ?

सरकारी सूत्रांच्या हवाल्याने इंडिया टुडेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर सुमारे ४-५ रुपयांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात सुमारे ४०-५० रुपयांची वाढ होऊ शकते. याला मंजुरी मिळाल्यास, जवळपास चार वर्षांतील ही पेट्रोल आणि डिझेलच्या दरातील पहिली दरवाढ असणार आहे. २०२२ पासून सरकारकडून किरकोळ दर मोठ्या प्रमाणात स्थिर ठेवण्यात आले आहेत.

युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ

पाच राज्यातील विधानसभा निवडणुका समाप्त झाल्यानंतर देशात इंधन आणि एलपीजी गॅसच्या दरात वाढ केली जाईल, असा दावा लोकसेभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केला होता. पण, सरकारने हा दावा फेटाळून लावत दरवाढ करणार नसल्याचे स्पष्ट केले. पश्चिम आशियातील युद्धामुळे जागतिक कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. याशिवाय पुरवठ्यात येणारा व्यत्यय, वाहतुकीसाठी निर्माण झालेले धोके आणि एकंदर अस्थिरतेच्या वातावरणामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत, यामुळे तेल विपणन कंपन्यांचा उत्पादन खर्चही वाढला आहे.

येत्या पाच ते सात दिवसांमध्ये निर्णय

जागतिक तेल व्यापार आणि युद्धाचा परिणाम या स्थितीकडे सरकार लक्ष ठेवून आहे. पण, येत्या पाच ते सात दिवसांमध्ये इंधन आणि एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ केली जाण्याची शक्यता आहे, असे ‘इंडिया टुडे’ने सरकारी सूत्रांच्या हवाल्याने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात म्हटले आहे. या संदर्भात सध्या चर्चा सुरु असून, दरवाढ पुढे ढकलता येईल का याबाबतही चाचपणी सुरु आहे. तेल कंपन्यांवरील आर्थिक बोजा आणि महागाई या समन्वय साधण्याचा प्रयत्न देखील सरकार करत असल्याचे या वृत्तात म्हटले आहे. दरम्यान, ही दरवाढ झाल्यास सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे.

राहुल गांधींची टीका

दरम्यान, व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ केल्यानंतर विरोधकांनी अपेक्षेप्रमाणे केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. “निवडणुकीनंतर इंधनाच्या किंमती वाढतील असे मी आधीच म्हटले होते. पहिला वार एलपीजी गॅसवर झाला आहे. दुसरा वार आता पेट्रोल आणि डिझेलवर होईल”, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. “व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरवाढीमुळे चहाच्या टपऱ्या ते ढाबा, हॉटेल, बेकरी आणि मिठाईच्या दुकानांना बसणार आहे. म्हणजेच महागाईची झळ ही सामान्य माणसालाच पर्यायाने बसणार आहे”, असे राहुल गांधींनी म्हटले आहे.