पीटीआय, नवी दिल्ली
पश्चिम आशियातील संघर्षामुळे वाढलेल्या जागतिक कच्च्या तेलाच्या दरवाढीचा परिणाम ग्राहकांवर लादला जात आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी सोमवारी पेट्रोलच्या दरात प्रति लिटर २.६१ रुपयांनी आणि डिझेलच्या दरात २.७१ रुपयांनी वाढ केली. गेल्या १२ दिवसांत पेट्रोलियम कंपन्यांनी चौथ्यांदा इंधन दरवाढ केली असून एकूण दरवाढ जवळपास प्रति लिटर साडेसात रुपयांवर पोहोचली आहे.
बहुतांश शहरांमध्ये पेट्रोल व डिझेलचे दर १०० रुपयांच्या वर गेले आहेत. १५ मे रोजी पेट्रोलच्या दरात ३.१६ रुपयांची तर डिझेलच्या दरात ३.१० रुपयांची वाढ करण्यात आली होती. २०२४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रति लिटर दोन रुपयांची कपात वगळता दोन वर्षांहून अधिक काळ इंधनाचे दर मोठ्या प्रमाणात स्थिर राहिले होते. मात्र जागतिक पातळीवर तेलदरात वाढ झाल्यानंतर गेल्या १२ दिवसांत चार वेळा इंधनाच्या दरात वाढ करण्यात आली. इंधनाचे दर आता मे २०२२ नंतरच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहेत.
पश्चिम आशियातील अमेरिका, इस्रायल-इराण संघर्ष संपवण्यासाठी करार होण्याची आशा निर्माण झाल्याने जागतिक तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली असताना ही दरवाढ झाली. अमेरिका आणि इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडण्यास तत्त्वत: सहमती दर्शवल्यानंतर, जागतिक तेल किमतींचा प्रमुख मापदंड असलेल्या ब्रेंट क्रूडच्या किमतीत सात टक्क्यांहून अधिक घसरण झाली. पश्चिम आशियातील युद्धामुळे आणि जागतिक तेल वाहतुकीचा प्रमुख मार्ग असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतील वाहतुकीत व्यत्यय आल्यामुळे फेब्रुवारीच्या अखेरीपासून जागतिक कच्च्या तेलाच्या किमतीत ५० टक्क्यांहून अधिक वाढ झाली होती.
तेल कंपन्यांचा तोटा ६०० कोटींपर्यंत कमी
इंधन दरवाढीने सरकारी तेल कंपन्यांना इंधन उत्पादन खर्चापेक्षा कमी दरात विकल्यामुळे होणारा तोटा प्रति दिन जवळपास ६०० कोटी रुपयांपर्यंत कमी झाला आहे, असे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी सोमवारी सांगितले. १५ मे रोजी पहिली इंधन दरवाढ होण्यापूर्वी पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी यांच्या विक्रीतील तोटा प्रति दिन सुमारे १,००० कोटी रुपये होता.
राहुल गांधी यांची पंतप्रधानांवर टीका
इंधन दरवाढीवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कडाडून टीका केली आणि पंतप्रधानांचा उल्लेख ‘महागाई मानव’ असा केला. निवडणुकीच्या वेळी आश्वासने देणे आणि इतर वेळी सामान्य नागरिकांच्या खिशावर हल्ला करणे, हेच मोदींचे एकमेव काम आहे. अनेक महिन्यांपासून मी येऊ घातलेल्या आर्थिक वादळाबद्दल इशारा देत होतो, पण मोदी त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे निवडणुकांमध्ये व्यग्र होते आणि निवडणुका संपताच त्यांनी दरवाढ केली, असे ते म्हणाले.
चौथी दरवाढ
पेट्रोल डिझेल
१५ मे ३.१६ ३.१०
१९ मे ०.९१ ०.९४
२३ मे ०.८७ ०.९१
२५ मे २.६१ २.७१
मुंबईतील दर
पेट्रोल : १११.१८ रुपये प्रति लिटर
डिझेल: ९७.८३ रुपये प्रति लिटर
