Petrol Diesel Price Hike India impact: International conflict triggers sudden fuel rate surge by Nayara Energy : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाच्या झळा जगभरातील देशांना बसत आहेत. या युद्धामुळे जगभरातील इंधन पुरवठा विस्कळीत झाला असून भारतात देखील इंधनाच्या किमती वाढल्याचे पाहायला मिळत आहे. देशातील सर्वात मोठी खासगी इंधन किरकोळ विक्रेता कंपनी नायरा एनर्जीने (Nayara Energy) इंधनाचे दर वाढवल्यामुळे भारतात पेट्रोलच्या किमतीत प्रति लिटर ५.३० रुपये, तर डिझेलच्या किमतीत प्रति लिटर ३ रुपयांची वाढ झाली आहे.
भारतात गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सातत्याने वाढताना दिसत आहेत. होर्मुझची सामुद्रधुनी बंद असणे आणि अमेरिका-इराण यांच्याकडून ऊर्जा केंद्रांवर होत असलेले हल्ले याचा जागतिक पुरवठ्यावर परिणाम झाल्याने यामध्ये अधिकच भर पडली.
यादरम्यान इंधन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर भारतातील अनेक राज्यात लोक पेट्रोल पंपांवर गर्दी करताना पाहायला मिळत आहेत. इतकेच नाही तर एलपीजी सिलेंडरसाठी देखील लोकांनी रांगा लावल्या आहेत.
पेट्रोलच्या किमतीत वाढ
देशभरातील पेट्रोलच्या किमतीबद्दल बोलायचे झाल्यास सर्वाधिक किमत ही हैदराबाद येथे नोंदवली गेली, येथे गुरूवारी एका लिटर पेट्रोलसाठी ग्राहकांना १०७.४६ रुपये मोजावे लागले.
मुंबई आणि कोलकाता यासारख्या इतर प्रमुख शहरांमध्येही पेट्रोलचे दर १०० रुपये प्रति लिटरच्या वर पोहोचले आहेत. डिझेलच्या किमतीतही हैदराबाद ९५.७० रुपये प्रति लिटरसह अव्वल स्थानी आहे.
कोणत्या शहरात कसे दर?
प्रमुख शहरांमधील पेट्रोलचे दर (प्रति लिटर)
| शहर | किंमत (रुपये) |
| हैदराबाद | १०७.४६ |
| कोलकाता | १०५.४१ |
| मुंबई | १०३.५४ |
| बेंगळुरू | १०२.९२ |
| भुवनेश्वर | १०१.१९ |
| चेन्नई | १००.८ |
| गुडगाव | ९५.९७ |
| नोएडा | ९५.१६ |
| नवी दिल्ली | ९४.७७ |
| चंदीगड | ९४.३ |
प्रमुख शहरांमधील डिझेलचे दर (प्रति लिटर)
| शहर | किंमत (रुपये) |
| हैदराबाद | ९५.७ |
| भुवनेश्वर | ९२.७७ |
| चेन्नई | ९२.३९ |
| कोलकाता | ९२.०२ |
| बेंगळुरू | ९०.९९ |
| मुंबई | ९०.०३ |
| नोएडा | ८८.३१ |
| गुडगाव | ८८.०३ |
| नवी दिल्ली | ८७.६७ |
| चंदीगड | ८२.४५ |
देशात इंधनाचा कोणताही तुडवडा नसल्याचे सरकारकडून वारंवार सांगितले जात आहे, तरी देखील अफवांमुळे लोक पेट्रोल आणि डिझेलच्या खरेदीसाठी गर्दी करताना दिसत आहेत. महाराष्ट्रात देखील अनेक शहरांमध्ये लोकांनी पेट्रोल पंपांवर गर्दी करत रांगा लावल्याचे पाहायला मिळाले.
