काँग्रेस नेते राहुल गांधी केंद्रातील मोदी सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. सोशल मीडियावरून केंद्र सरकारमधील ध्येय धोरणांवर ते परखड मत मांडतात. करोना संकट आणि केंद्र सरकारच्या उपाययोजना यावरून ते रोजच केंद्र सरकारला खडे बोल सुनावत आहेत. आता पेट्रोल डिझेलच्या किंमतीवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. अनेक दिवसांपासून स्थिर असलेल्या पेट्रोल डिझेलचे दर आता पुन्हा वाढू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी केंद्रावर टीका केली आहे.

पाच राज्यातील विधानसभा निवडणुका संपल्यानंतर पुन्हा एकदा पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढल्याचं कारण देत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ‘निवडणुका संपल्या, पुन्हा लूट सुरु’ असं ट्वीट केलं आहे. तर त्यांनी पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमती असा हॅशटॅग दिला आहे.

दिल्लीत आज पेट्रोल प्रति लिटर ९०.९९ रुपये आणि डिझेल ८१.४२ रुपये आहे. मुंबईत पेट्रोल ९७.३४ रुपये आणि डिझेल ८८.४९ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा दर ९२.९० रुपये आणि डिझेल ८६.३५ रुपये आहे. तर कोलकातामध्ये पेट्रोल ९१.१४ रुपये आणि डिझेल ८४.२६ रुपये इतकं आहे.

लॉकडाऊनमुळे व्यापारी, वाहतूकदार आणि सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. त्यात पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढत असल्याने आणखी महागाईची झळ सोसावी लागणार आहे.