करोना व लॉकडाउनमुळे आर्थिक मिळकतीवर परिणाम झालेल्या सर्वसामान्यांच्या खिशाला इंधन दरवाढीच ग्रहण लागलं आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सलग पंधरा दिवसांपासून वाढ होतं आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी सोमवारी पेट्रोल डिझेलच्या दरात आणखी वाढ केली आहे. त्यामुळे पेट्रोलचे दर ८० रुपये प्रति लिटरपर्यंत गेले आहेत. तर डिझेलचे दर ७९ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.

पेट्रोलियम कंपन्यांनी सलग सोळाव्या दिवशी इंधनाच्या दरात वाढ केली. ही काही पैशांची असली, तरी सलग पंधरा दिवसांपासून होत असलेल्या वाढीनं सामान्य नागरिकांच्या खिशावरील ताण वाढला आहे. पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ३३ पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे वाढलेल्या दरामुळे राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर ७९ रुपये ५६ पैसे इतके झाले आहेत. तर डिझेलच्या दरात प्रति लिटर ५८ पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे डिझेलच्या दर वाढून ७८ रूपये ८५ प्रति लिटर इतके झाले आहेत.

रविवारी (२१ जून) पेट्रोलच्या दरात ३५ पैशांची, तर डिझेलच्या दरात ६० पैसे वाढ करण्यात आली होती. यामुळे या कालावधीत पेट्रोलच्या दरात लिटरमागे ७.९७ रुपये तर डिेझेलच्या दरात ८.८८ रुपयांची वाढ झाली आहे. ही इंधन दरवाढ आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता वर्तवली गेली होती.

करोनाची स्थिती आणि थांबलेले अर्थचक्र लक्षात घेऊन मे पासूनच शासनाकडून टाळेबंदीत काही सवलती देण्यात आल्या. त्यानंतर इंधनाचा वापर वाढू लागला. या काळात करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून इंधनावर प्रतिलिटर दोन रुपयांचा मूल्यवर्धित कर लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. १ जूनपासून त्याची अंमलबजावणी करण्यात आली. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी असल्या तरी देशांतर्गत बाजारात मात्र पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढताना दिसत आहे.