scorecardresearch

Petrol-Diesel Prices: इंधन दरवाढ रोखण्यासाठी केंद्र सरकार…; केंद्रीय अर्थमंत्र्यांचं सूचक वक्तव्य

युक्रेन आणि रशिया युद्धामुळे जागतिक तेल बाजारपेठेमध्ये तेलाची किंमत प्रति बॅरल १३० डॉलर्सपर्यंत पोहचलीय.

petrol diesel prices in India
अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी एका कार्यक्रमात बोलताना दिले संकेत (फाइल फोटो)

आंतरराष्ट्रीय तेल बाजारामध्ये तेलाच्या वाढत्या दरांमुळे केंद्र सरकारची चिंताही वाढलीय. युक्रेन आणि रशियादरम्यान सुरु असणाऱ्या युद्धामुळे कच्च्या तेलाचे दर वाढल्याने केंद्र सरकार देशातील इंधनाचे दर स्थिर ठेवण्यासाठी अर्थसंकल्पीय तरतुदींचा वापर करण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी यासंदर्भात भाष्य करताना कच्च्या तेलाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाढल्याने त्याचा परिणाम देशातील इंधनदरांवरही होणार आहे, असं सांगितलं. मात्र याचा मोठा फटका सर्वसामान्यांना बसू नये म्हणून सरकार वेगवेगळे पर्याय पडताळून पाहत असल्याचे संकेत केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिले.

कुठे बोलत होत्या केंद्रीय अर्थमंत्री?
केंद्रीय अर्थमंत्री बंगळुरु येथे आयोजित ‘आत्मनिर्भर भारतीय अर्थव्यवस्था’ या भाजपाने आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी भारतीय तेल कंपन्यांकडून इंधनदरवाढ नियंत्रित राहील यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचे संकेत दिले. तसेच आंतरराष्ट्रीय तेल बाजारातील दरवाढीचा ग्राहकांना कमीत कमी फटका बसावा असे पर्याय शोधण्याचे प्रयत्न सुरु असल्याचंही निर्मला सीतारमन यांनी सूचित केलं.

नक्की वाचा >> “अजित पवारांना टाळता येणे मला शक्यच नाही, खरं तर…”; निर्मला सीतारामन यांचं विधान

निर्मला नक्की काय म्हणाल्या?
इंधन दरवाढ रोखण्यासाठी केंद्र हस्तक्षेप करू शकते, असे स्पष्ट संकेत निर्मला सीतारामन यांनी दिलेत. “आपण एकूण कच्च्या तेलापैकी ८५ ते ९० टक्के तेल आयात करतो. त्यामुळेच दरवाढ ही चिंतेची बाब आहे. मात्र त्याचवेळी पर्यायांचाही विचार केला जाईल. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेऊ आहोत. यातून काय मार्ग काढता येईल यावर विचार सुरु आहे. मला परिस्थितीची पूर्ण कल्पना आहे,” असं निर्मला सीतारामन यांनी म्हटलंय.

नक्की वाचा >> Petrol-Diesel Prices: काही शहरांमधील इंधनाच्या दरांमध्ये बदल; पाहा ९ मार्च २०२२ रोजीचे इंधनाचे दर

युक्रेनमधील संकट हे संधी सुद्धा…
युक्रेनमधील संघर्षामुळे अनेक आव्हानं निर्माण झाली आहेत असं सांगतानाच निर्मला यांनी या संकटाकडे भारतासारख्या देशाने संधी म्हणून पाहिलं पाहिजे. गहू निर्यात करण्यासंदर्भात त्या बोलत होता. युक्रेनला जगाचं गव्हाचं कोठार म्हणून ओळखलं जातं. मात्र मागील काही वर्षांमध्ये भारतामधून गव्हाची निर्यात वाढलीय.

करोना काळात आत्मनिर्भर भारत…
करोना कालावधीमध्ये भारताने आत्मनिर्भर मंत्र स्वीकारत पाच कोटी पीपीई कीट्स निर्माण केले. तसेच देशांतर्गत एक लस तयार करुन ती जगभरामध्ये पाठवली, असं अर्थमंत्री म्हणाल्या. “कोविन सारख्या गोष्टींमुळे जगभरात फायदा झाला. त्यामुळे आत्मनिर्भर भारत केवळ तुमच्यासाठी, माझ्यासाठी नसून पूर्ण जगासाठी आहे,” असंही निर्मला यांनी म्हटलंय.

इंधन दरांचा भडका उडण्याची शक्यता…
सरकारी तेल कंपन्यांनी बुधवारी (९ मार्च २०२२ रोजी) देशातील काही शहरांमधील इंधनाच्या दरांमध्ये थोडेफार बदल केलेत. मात्र चार मुख्य मेट्रो शहरांपैकी केवळ चेन्नईमधील दरांमध्ये थोडाफार बदल झालाय. काही राज्यांच्या राजधान्यांच्या शहरांमधील दर किंचित बदलले आहेत. युक्रेनमध्ये सुरु असणाऱ्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक तेल बाजारपेठेमध्ये तेलाची किंमत प्रति बॅरल १३० डॉलर्सपर्यंत पोहचलीय. त्यामुळेच देशात कधीही इंधनदरवाढीचा भडका उडू शकतो अशी भिती व्यक्त केली जातेय. १० मार्च रोजी पाच राज्यांच्या निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर इंधनदरवाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. मुंबई, दिल्ली आणि कोलकाता या शहरांमधील इंधनाचे दर मागील चार महिन्यांपासून स्थिर आहेत. मुंबईत पेट्रोलचे दर लिटरमागे ११० रुपये इतका आहे. महाराष्ट्रातील जवळजवळ सर्वच शहरांमधील दर मुंबईप्रमाणे पूर्वीसारखेच आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Petrol diesel prices centre may intervene to tackle fuel price rise nirmala sitharaman scsg

ताज्या बातम्या