पेट्रोल-डिझेलच्या दररोज वाढणाऱ्या किंमतीला वैतागलेल्या नागरिकांना आज सकाळी तेलकंपन्यांनी दिलासा दिला. परंतु, हा दिलासा औट घटकेचाच ठरला. तेलकंपन्यांनी बुधवारी पेट्रोल ६० पैसे आणि डिझेल ५६ पैशांनी स्वस्त झाल्याचे जाहीर केले. पण वास्तवात पेट्रोलच्या दरात फक्त एक पैशाचीच कपात झाली आहे. इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर एका चुकीमुळे तिथे ६० पैशांची कपात दिसत होती. चूक लक्षात येताच कंपनीकडून स्पष्टीकरण देण्यात आले आणि पेट्रोलच्या दरात फक्त एका पैशाचीच कपात केल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तेल कंपन्यांच्या या प्रकारामुळे देशातील नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने स्पष्टीकरण देताना म्हटले की, पेट्रोल आणि डिझेलचे दर पोस्ट करताना एक तांत्रिक चूक झाली होती. ती आता दुरूस्त करण्यात आली आहे. आजच्या पेट्रोलियम पदार्थाच्या दरात काही मोठा बदल झालेला नाही.

सध्या दिल्लीत एक लिटर पेट्रोलसाठी ७८.४२ आणि मुंबई ८६.२३ पैसे असा दर आहे. तर डिझेल दिल्लीत ६९.३० रूपये तर मुंबईत ७३.७८ रूपये प्रति लिटर असा दर आहे.

गेल्या १६ दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत असल्याने नागरिकांमधून असंतोष व्यक्त केला जात आहे. पेट्रोल-डिझेलचे दर हे आता सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. अशातच याच्या किमतीत सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे केंद्र सरकारवर रोष व्यक्त केला जात आहे.

सरकार या परिस्थितीशी निपटण्यासाठी लवकरच तोडगा काढणार असल्याचे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले होते. पण आता सरकारचे म्हणणे आहे की, पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीवर तात्कालिक दिलासा देण्यापेक्षा दीर्घकालीन उपाय शोधण्याचा सरकारचा विचार असल्याचे म्हटले आहे.