आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाच्या किमतीत घट झाल्याने देशभरातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात लिटरमागे सुमारे अडीच रुपयांची कपात झाली आहे. ऑगस्टपासूनची ही सहावी कपात आहे. ही कपात शुक्रवार मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.
मुंबईत सध्या पेट्रोल लिटरमागे ७४ रुपये ४६ पैसे होते. त्यात दोन रुपये ५५ पैशांची घट झाली असून आता मुंबईत पेट्रोलचा दर हा लिटरमागे ७१ रुपये ९१ पैसे राहील.  मुंबईत डिझेलचा दर सध्या लिटरमागे ६३ रुपये ५४ पैसे आहे. त्यात आता अडीच रुपयांची घट झाली असून मुंबईत डिझेल प्रतिलिटर ६१ रुपये ४ पैसे दराने मिळेल. पेट्रोल पंपमालकांना विक्रीमागे दहा ते पंधरा पैशांचे वाढीव कमिशन अंतर्भूत करून ही घट करण्यात आली आहे. कमिशनमध्ये वाढ झाली नसती तर ही घट आणखी झाली असती, असा दावा सूत्रांनी केला.  विनाअनुदानित एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरातही १८ रुपये ५ पैशांची कपात झाली आहे.