पेट्रोलच्या प्रति लिटर दरात २.३५ रु. तर डीझेलच्या प्रति लिटर दरात ५० पैशांची (स्थानिक कर वगळून) वाढ करण्याचा निर्णय सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी शनिवारी घेतला. ही दरवाढ शनिवारी मध्यरात्रीपासूनच अमलात आली आहे. याखेरीज, केरोसिनच्या प्रति लिटर दरात दोन रुपये, एलपीजी गॅसच्या प्रति सिलिंडरमागे ५० रुपये तर डीझेलच्याच दरात प्रति लिटरमागे आणखी तीन ते पाच रुपयांची टांगती तलवार सामान्यांच्या डोक्यावर आहे. या वाढीमुळे मुंबईकरांना आता प्रति लिटरसाठी तब्बल ८१.५७ रु. मोजावे लागणार आहेत. तेल कंपन्यांना झालेला एक लाख ८० हजार कोटी रुपयांचा तोटा भरून काढण्यासाठी केरोसिन, स्वयंपाकाचा गॅस आणि डीझेलच्याही दरात आणखी वाढ करण्यासाठी वीरप्पा मोईली यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना साकडे घातले आहे.