महागाईचा दाह सोसणाऱ्या सर्वसामान्यांना आता इंधन दरवाढीचेही चटके बसू लागले आहेत. देशात इंधनाचे दर गगनाला भिडले असून, पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांमुळे नागरिकांच्या खिशालाही झळ बसू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून इंधनाचे दर सातत्यानं वाढत आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यात पेट्रोलच्या दरांनी केव्हाच शंभरी ओलांडली असून, डिझेलही शंभरीच्या उंबरठ्यावर पोहोचलं आहे. सोमवारी तेल वितरक कंपन्यांनी पुन्हा पेट्रोलच्या दरात वाढ केल्याने पेट्रोलच्या किंमतींनी नवा उच्चांक गाठला.

रविवारी देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दरात कोणताही बदल झाला नाही. तर शनिवारी (१० जुलै) पेट्रोलच्या दरात ३५ पैसे आणि डिझेलच्या दरात २६ पैशांची वाढ करण्यात आली होती. एका दिवसाच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा एकदा इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. मात्र, डिझेलच्या दरात कपात करण्यात आली आहे. तब्बल दोन महिन्यांनंतर पहिल्यांदाच डिझेलच्या दरात कपात करण्यात आल्याने दरात लिटरमागे घसरण झाली आहे. पेट्रोलच्या दरात २७ पैशांची वाढ झाली आहे. तर डिझेल १६ पैशांनी स्वस्त झाले आहे.

पेट्रोलच्या दरात २७ पैसे वाढ झाल्यामुळे मुंबईत पेट्रोल प्रतिलिटर १०७.२० म्हणजे १०८ रुपयांवर जाऊन पोहोचलं आहे. तर कपात होऊनही डिझेलसाठी प्रतिलिटर ९७.२९ रुपये मोजावे लागत आहेत. मुंबईबरोबरच कोलकाता आणि दिल्लीतही इंधनाच्या दरांचा भडका उडाला आहे.

दिल्लीत पेट्रोलचे दर प्रतिलिटर १०१.१९ रुपये इतके असून, डिझेल प्रतिलिटर ८९.७२ रुपये आहे. भोपाळमध्ये पेट्रोल दर लिटरमागे १०९.५३ रुपये आहे. डिझेलही ९८.५० रुपयांवर पोहोचलं आहे. तर कोलकात्यात पेट्रोलसाठी लिटरमागे १०१.३५ रुपये मोजावे लागत आहेत. आजच्या दर कपातीने मुंबईतील डिझेलचा भाव ९७.२९ रुपये झाला आहे. रविवारी ९७.४६ रुपये इतका होता.