scorecardresearch

पाकिस्तानात पेट्रोल २५०, तर डिझेल २६३ रुपये प्रतिलिटर 

अर्थमंत्री इशक दार यांनी रविवारी सकाळी दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दरवाढीची घोषणा केली.

Pakistan hikes petrol diesel price,
(संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता

इस्लामाबाद : आर्थिक चणचणीत असलेल्या पाकिस्तान सरकारने रविवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रतिलिटर ३५ रुपयांनी वाढविले. त्यामुळे महागाईने त्रस्त झालेल्या नागरिकांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

या दरवाढीनंतर प्रतिलिटर पेट्रोलचा दर २४९ रुपये ८० पैसे, हाय स्पीड डिझेल- २६२ रुपये ८० पैसे, तर केरोसिन- १८९ रुपये ८३ पैसे, हलके डिझेल १८७ रुपये असा झाला आहे.

अर्थमंत्री इशक दार यांनी रविवारी सकाळी दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दरवाढीची घोषणा केली. याआधी इंधनाच्या दरांची दर महिन्याच्या पहिल्या पंधरवडय़ात फेररचना केली जात होती. दार यांनी सांगितले की, रविवारीच सकाळी ११ वाजल्यापासून ही दरवाढ अंमलात येत आहे. केरोसिन आणि हलक्या डिझेलच्या दरातही प्रतिलिटर १८ रुपये वाढ करण्यात आली आहे.

गेल्या आठवडय़ात पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी सांगितले होते की, आंतरराष्ट्रीय कर्ज मिळवण्यासाठी देश आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अटींची कडू गोळी गिळण्यास तयार आहे. अर्थसाह्याबाबत चर्चेसाठी नाणेनिधीचे पथक ३१ जानेवारी ते ९ फेब्रुवारीदरम्यान इस्लामाबादमध्ये असणार आहे.

पाकिस्तानी रुपयाचे आठवडाभर अवमूल्यन झाले आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलियम उत्पादनांचे दर ११ टक्के वाढले आहेत, अशी माहिती अर्थमंत्र्यांनी दिली. पाकिस्तानात इंधनाचे दर ५० रुपयांनी वाढणार असल्याची चर्चा आधीपासूनच समाजमाध्यमांत होती. त्यामुळे पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरवाढीच्या  चर्चेमुळे  इंधनाचा कृत्रिम तुटवडा  निर्माण झाला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 05:20 IST