टोरांटो : ज्या लोकांना फायझर व अ‍ॅस्ट्राझेनेका लशी देण्यात आल्या त्यांच्यात ज्यांना सार्स सीओव्ही २ विषाणूचा संसर्ग झाला होता त्यांच्या तुलनेत जास्त प्रतिपिंड तयार झाले असे सायंटफिक रिपोर्टस या नियतकालिकात म्हटले आहे.

युनिव्हर्सिटी ऑफ माँट्रियल या कॅनडातील विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी याबाबत संशोधन केले असून या अभ्यासात कोविड १९ संसर्ग झालेल्या ३२ रुग्णांचा अभ्यास पीसीआर चाचणी सकारात्मक आल्यानंतर १४ ते २१ दिवस करण्यात आला त्यावेळी बिटा, डेल्टा, गॅमा हे विषाणू प्रकार आलेले नव्हते. त्या सर्वांमध्ये संसर्ग असला व प्रतिपिंडे तयार झाली असली तरी वयस्कर म्हणजे पन्नाशीच्या पुढील व्यक्तीत प्रतिपिंड अधिक दिसून आले, असे प्रा. जीन फ्रँकॉइस मॅसन यांनी म्हटले आहे. हे प्रतिपिंड १६ आठवडे रक्तात टिकून होते मूळ विषाणूच्या संसर्गानंतर बिटा, डेल्टा, गॅमा हे विषाणू आले त्यावेळी प्रतिपिंडांच्या संख्येत ३० ते ५० टक्के घट काही रुग्णात दिसून आली. नैसर्गिक संसर्ग झालेल्या व्यक्तींमध्ये ५० व त्यावरील वयोगटात जे प्रतिपिंड आढळून आले ते पन्नाशीच्या खालच्या गटातील रुग्णांपेक्षा अधिक होते. डेल्टा विषाणूच्या काटेरी प्रथिनाशी होणाऱ्या क्रियेनंतर त्याला निष्प्रभ करण्याची क्षमता यात महत्वाची मानली गेली होती. इतर करोना विषाणू संसर्गात या प्रकारचे निष्कर्ष आढळून आले नाहीत. काही व्यक्तींचे लसीकरण केलेले होते त्यांच्यात लस न दिलेल्या व्यक्तींपेक्षा जास्त प्रतिपिंड दिसून आले. ४९ व त्याखालील वयोगटाच्या लसीकरण केलेल्या व्यक्तींमध्ये प्रतिपिंडांचे प्रमाण लसीकरण न केलेल्या व्यक्तींच्या तुलनेत जास्त दिसून आल्याचे प्रा. मॅसन यांनी म्हटले आहे. याचा अर्थ लसीकरणामुळे डेल्टा विषाणूपासून जास्त संरक्षण मिळते. याबाबतचे निष्कर्ष हे अंतिम नसून त्यावर अधिक संशोधनाची गरज असल्याचेही सांगण्यात आले.