फायझर, ऑक्सफर्ड लशी ‘डेल्टा’वर परिणामकारक

ऑक्सफर्ड अ‍ॅस्ट्राझेनेकाची लस भारतात कोविशिल्ड नावाने तयार करण्यात आली होती

covishield-vaccine
(संग्रहित छायाचित्र)

लंडन : भारतात प्रथम आढळून आलेल्या डेल्टा या करोना विषाणूवर अमेरिकेची फायझर तसेच ब्रिटनमध्ये तयार झालेली ऑक्सफर्डची अ‍ॅस्ट्राझेनेका लस परिणामकारक आहे. डेल्टा विषाणमुळे आधीच्या विषाणूपेक्षा रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण दुप्पट असूनही या लशी त्या विषाणूवर परिणामकारक ठरल्या आहेत.

सध्या या विषाणूचा प्रसार ब्रिटनमध्ये व इतर काही देशांत झालेला आहे. पब्लिक हेल्थ  स्कॉटलंड व युनिव्हर्सिटी ऑफ एडिंबर्ग या संस्थांनी केलेल्या अभ्यासात असे दिसून आले की, फायझर व बायोएनटेकची लस डेल्टा विषाणूवर चांगली परिणामकारक आहे. ऑक्सफर्ड व अ‍ॅस्ट्राझेनेका लसही या विषाणूवर परिणामकाक आहे, पण  फायझरची लस अ‍ॅस्ट्राझेनेकापेक्षा दुप्पट प्रभावी ठरली आहे.

ऑक्सफर्ड अ‍ॅस्ट्राझेनेकाची लस भारतात कोविशिल्ड नावाने तयार करण्यात आली होती. १ एप्रिल ते ६ जून २०२१ दरम्यान १९५४३ जणांचा अभ्यास केला असता त्यातील ३७७ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागल्याचे स्कॉटलंडमध्ये दिसून आले. ७७२३ जणांवरील प्रयोगात १३४ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यांच्यात डेल्टा विषाणूची लागण झालेली होती.

आतापर्यंतच्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, फायझरची लस अल्फा विषाणूपासून ९२ टक्के  तर डेल्टा विषाणूपासून ७९ टक्के संरक्षण देत आहे. अ‍ॅस्ट्राझेनेका लस डेल्टा विषाणूपासून ६० टक्के संरक्षण देत आहे तर अल्फा विषाणूपासून ७३ टक्के संरक्षण देत आहे. ज्यांनी दोन मात्रा घेतल्या होत्या त्यांच्यात डेल्टा विषाणूपासून चांगले संरक्षण मिळाल्याचे दिसून आले.

संशोधकांनी म्हटले आहे की, फायझर व अ‍ॅस्ट्राझेनेका या दोन्ही लशी डेल्टा विषाणूवर परिणामकारक आहेत. त्या लशींमुळे रुग्णालयात दाखल करण्याची वेळ  येत नाही. पण कालांतराने या लशींमुळे मिळणारे संरक्षण कमी होत जाते. फायझर लस ही  डेल्टावर जास्त परिणामकारक आहे. पण या दोन्ही लशीतील घटक वेगळे असून  संरक्षण किती काळात मिळते व टिकते हेही महत्त्वाचे आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pfizer oxford astrazeneca vaccines protect against delta variant zws

ताज्या बातम्या