24.76 lakh applicants for peon jobs in Rajasthan : सरकारी नोकरी मिळवण्यासाठी देशभरातील लाखो तरूण दररोज अत्यंत कठोर मेहनत घेताना दिसतात. लहान-मोठी सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मोठ्या संख्येने अर्ज दाखल केले जातात. असाच प्रकार नुकताच समोर आला असून राजस्थानमध्ये तब्बल ५३,७४९ शिपाई पदांसाठी २४.७६ लाखांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले आहेत. विशेष म्हणजे या अर्जदारांमध्ये पीएचडी, एमबीए अशा पदव्या असलेले तसेच नागरी सेवा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांचा देखील समावेश असल्याची बाब समोर आली आहे.

लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे येथे एका पदासाठी ४६ अर्जदार रांगेत आहेत. यापैकी बरेचसे उमेदवार हे उच्चशिक्षित आहेत आणि याबरोबरच ते प्रशासकीय सेवेत नोकरी मिळवण्यासाठी तयारी करत आहेत.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, उमेदवारांची संख्या इतकी जास्त होती की यामुळे प्रक्रियेवर तणाव आला. अनेक उमेदवारांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला, यामुळे वेबसाईट अनेक वेळा बंद पडली. अर्ज भरण्यासाठी अखेरचे पाच तास शिल्लक असताना १.११ लाख अर्ज दाखल करण्यात आले, याचाच अर्थ जवळपास प्रत्येक सहा सेकंदाला एक अर्ज दाखल करण्यात आला.

काही उमेदवारांना तांत्रिक अडचणी तसेच कागदपत्रांची पूर्तता न करू शकल्याने अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करता आली नाही. सध्या नोकरी हवी असलेल्या तरुणांची संख्या खूप मोठी आहे. यापूर्वी, २,३९९ वनरक्षक पदांसाठी २२ लाख उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यात आले होते.

राजस्थानमध्ये १८ लाख नोंदणी केलेले बेरोजगार

अधिकृत आकडेवारीनुसार राजस्थान येथे १८ लाख तरुण हे नोंदणीकृत बेरोजगार आहेत. नोंदणी न केलेले मिळून हा अकडा ३० ते ३५ लाखांच्या दरम्यान असल्याचे सांगितले जाते.

राजस्थान स्टाफ सिलेक्शन बोर्डाचे सचिव भागचंद बधल यांनी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल करण्यात आल्याची पुष्टी केली. ते म्हणाले की, शिपाई पदांसाठी किमान पात्रता दहावी आहे, ज्यामुळे विविध प्रकारचे अर्जदारांनी अर्ज केले आहेत.

सध्या प्रशासनापुढे या उमेदवारांची परीक्षा घेण्याचं आव्हान उभं ठाकलं आहे. राजस्थानकडे एका वेळी जवळपास ३ लाख उमेदवारांची परीक्षा आयोजित करण्याची क्षमता आहे, त्यामुळे आता ही प्रक्रिया अनेक फेऱ्यांमध्ये घ्यावी लागणार आहे.