Viral Philippines Earthquake Video : फिलिपिन्सच्या दक्षिणेकडील मिंदानाओ बेटावर सोमवारी (८ जून) सकाळी ७.८ रिश्टर तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे जनरल सॅंटोस शहरातील अनेक इमारती कोसळल्याची माहिती समोर आली आहे. भूकंपानंतर फिलिपिन्स आणि इंडोनेशियासाठी त्सुनामीचा हाय-अलर्ट जारी करण्यात आला. संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर किनारपट्टी भागातील नागरिकांना तातडीने सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.
जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसायन्सेस (GFZ) नुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली सुमारे १० किमी इतक्या कमी खोलीवर होता. या भूंकपात आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद असल्याचे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
भूकंपानंतर त्सूनामीचा इशारा
या भूकंपानंतर अमेरिकेच्या त्सुनामी चेतावणी प्रणालीने त्सुनामीचा धोका संभवत असल्याचा इशारा दिला होता. भूकंपानंतर लगेचच फिलिपिन्स आणि इंडोनेशियाच्या अधिकाऱ्यांनी सतर्कतेचा इशारा जारी केला. फिलिपिन्स इन्स्टिट्यूट ऑफ व्होल्कॅनॉलॉजी अँड सिस्मॉलॉजी ने भूकंपाची तीव्रता कमी म्हणजेच ७.० एवढी नोंदवली. तसेच, यामुळे नुकसान होण्याचा धोका असून समुद्रकिनाऱ्यांवर एक मीटरपेक्षा जास्त उंचीच्या त्सुनामी लाटा येऊ शकतात आणि त्या काही तास राहू शकतात, असा इशारा दिला.
दरम्यान, इंडोनेशियाच्या ‘BMKG’ संस्थेने भूकंपाची तीव्रता ७.७ असण्याचा अंदाज व्यक्त केला. सारंगानी (Sarangani) प्रांतातील अलाबेल (Alabel) शहराचे पोलिस प्रमुख बेंजी अंकेटा यांनी सांगितले की, भूकंपाच्या धक्क्यांमुळे स्थानिक पोलिस ठाण्याच्या इमारतीला किरकोळ तडे गेले आहेत. अंकेटा यांनी रॉयटर्सला फोनवरून सांगितले, “आम्ही अनुभवलेला हा आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली भूकंप आहे.”
उत्तर इंडोनेशियातील मनाडो (Manado) शहरातील प्रत्यक्षदर्शींनीही भूकंपाचे तीव्र धक्के जाणवल्याचे सांगितले. फिलिपिन्स आणि इंडोनेशिया हे देश प्रशांत महासागराच्या ‘रिंग ऑफ फायर’ क्षेत्रात येतात. हा भाग भूपट्ट्यांच्या हालचालींमुळे वारंवार होणारे भूकंप आणि ज्वालामुखीच्या सक्रियतेसाठी ओळखला जातो.
फिलिपिन्समध्ये आपत्ती प्रतिसाद सुरू आहे. फिलिपिन्सचे अध्यक्ष फर्डिनांड मार्कोस ज्युनियर म्हणाले की, आपत्ती प्रतिसादाचे समन्वय साधण्यासाठी अधिकारी वेगाने हालचाल करत आहेत. “केंद्र सरकार कार्यरत आहे आणि आम्ही मिंडानाओला मागे पाडणार नाही”, असे मार्कोस यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
