Philippines Ferry Fire Incident : फिलिपिन्समध्ये प्रवासी फेरीला भीषण आग लागल्याची घटना घडली असून, या दुर्घटनेत आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर ८० हून अधिक प्रवासी आणि कर्मचाऱ्यांचा अद्याप शोध लागलेला नाही. बेपत्ता व्यक्तींच्या शोधासाठी समुद्रात मोठ्या प्रमाणावर बचाव आणि शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. या घटनेबद्दल सविस्तर वृत्त दी इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.

मनिलाहून पालावानकडे जाताना फेरीला आग

‘एमवी जून ऍस्टर’ ही प्रवासी फेरी मनिलाहून पालावान प्रांतातील कोरोनकडे जात होती. फेरीमध्ये ११७ प्रवासी आणि १७ कर्मचारी असे एकूण १३४ जण होते. बुधवारी स्थानिक वेळेनुसार सायंकाळी सुमारे ६.४५ वाजता फेरीला अचानक आग लागली. आगीने काही वेळातच फेरीचा मोठा भाग आपल्या कवेत घेतला. जीव वाचवण्यासाठी घाबरलेल्या प्रवाशांनी समुद्रात उड्या मारल्या.

४३ जणांची पाण्यातून सुटका

फिलिपिन्स कोस्ट गार्डच्या बचाव पथकांनी समुद्रात उतरून ४३ जणांना सुरक्षित बाहेर काढले. त्यांना बरांगे तुर्दा येथील आपत्कालीन निवारा केंद्रात हलवण्यात आले. आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली असून, सुमारे ८६ प्रवासी आणि कर्मचारी अद्याप बेपत्ता असल्याचे वृत्त आहे. मात्र बचावकार्य सुरू असल्याने मृत, बचावलेले आणि बेपत्ता व्यक्तींची संख्या बदलू शकते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

खराब हवामानामुळे बचावकार्यात अडथळे

फेरीला लागलेली आग विझवण्यात आली असली तरी जहाज समुद्रातच तरंगत होते. त्यानंतर ते किनाऱ्यापासून आणखी दूर वाहून गेले. त्यातच खराब हवामान, समुद्रातील जोरदार लाटा आणि वेगवान प्रवाह यामुळे बचाव पथकांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. कोस्ट गार्डने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये रात्रीच्या अंधारात फेरी आगीच्या विळख्यात सापडल्याचे दिसत आहे. बचाव कर्मचारी पाण्यात अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढून छोट्या बोटींमध्ये सुरक्षितपणे हलवत असल्याचेही या व्हिडीओमध्ये दिसते.

‘आग माल ठेवण्याच्या जागेतून सुरू झाली असावी’

फेरीतून बचावलेल्या काही प्रवाशांनी अधिकाऱ्यांना दिलेल्या माहितीनुसार, आग सुरुवातीला माल ठेवण्याच्या जागेत लागली असावी. त्यानंतर ती वेगाने संपूर्ण फेरीमध्ये पसरल्याचे त्यांनी सांगितले.

फिलिपिन्स कोस्ट गार्डच्या प्रवक्त्या कमोडोर नोएमी कायाब्याब यांनी सांगितले की, बचावकार्य सुरू असल्याने या आकडेवारीत अजूनही बदल होत आहेत.

आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट

फेरीमध्ये कोणतेही परदेशी नागरिक होते का, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, याचा तपास सुरू आहे. कोस्ट गार्ड फेरीचालक आणि सागरी प्राधिकरणांशी समन्वय साधत आहे. तसेच बेपत्ता प्रवाशांचा शोध घेण्यासाठी समुद्रात व्यापक मोहीम राबवली जात आहे.