मणिपूरमधून जुलै महिन्यात बेपत्ता झालेल्या दोन विद्यार्थ्यांचे मृतदेह आढळून आले आहेत. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत त्यानंतर ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. याआधी मणिपूरमध्ये महिलांची नग्न धिंड काढली गेल्याचा व्हिडीओ समोर आला होता. त्यानंतर आता या दोन विद्यार्थ्यांची हत्या झाली असून त्यांच्या मृतदेहांचे फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये शस्त्रधारी व्यक्तीही दिसत आहेत. या दोन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह मात्र अद्याप मिळालेले नाहीत.
दोन्ही विद्यार्थ्यांचे फोटो व्हायरल
ज्या दोन विद्यार्थ्यांच्या मृतदेहांचे फोटो समोर आले आहेत ते दोन्ही विद्यार्थी मैतेई समुदायाचे आहेत. एकाचं नाव हिजाम लिनथोइंगबी तर दुसऱ्याचं नाव फिजाम हेमजीत असं आहे. पांढऱ्या टीशर्टमध्ये लिनथोइनगांबी आहे तर हेमजीत चौकटीच्या शर्टमध्ये दिसतो आहे. या दोघांच्या फोटोत दोन बंदुकधारी माणसं स्पष्टपणे दिसत आहेत.




पोलिसांविरोधात रोष
पोलिसांना ही माहिती मिळवण्यासाठी इतका वेळ का लागला? असा प्रश्न आता लोक विचारत आहेत. तसंच या घटनेची माहिती मिळताच पुन्हा एकदा देशभरात संताप व्यक्त होतो आहे. जुलै महिन्यात हे दोन विद्यार्थी बेपत्ता झाले होते. मात्र त्यांचा शोध लागला नव्हता. एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे दोघे दिसले होते. मात्र त्या शिवाय इतर कुठलीही माहिती समोर आलेली नव्हती. आता जे व्हायरल फोटो समोर आले आहेत त्यात या दोघांचीही हत्या झाल्याचं दिसतं आहे. एनडीटीव्हीने या विषयीचं वृत्त दिलं आहे.
सरकारने काय म्हटलं आहे?
मणिपूर सरकारने या घटनेबाबत एक्स (पूर्वीचे ट्विटर) या समाजमाध्यमावर प्रतिक्रिया दिली आहे. जुलै २०२३ मध्ये जे दोन विद्यार्थी बेपत्ता झाले होते त्यांचे फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आले आहेत. हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं आहे. या विद्यार्थ्यांची हत्या झाल्याचं समजतं आहे. या हत्या कुणी केल्या? याचा शोध आम्ही घेत आहोत. सुरक्षा दलांनी संशयितांची धरपकडही सुरु केली आहे.