IGI Airport: दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल १ वर एका प्रवाशाला मारहाण केल्याची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. प्रवाशाने आरोप केला की, ड्युटीवर नसलेल्या एका पायलटने हल्ला केला आहे. या घटनेचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, या घटनेनंतर एअर इंडिया एक्सप्रेसने एक निवेदन जारी करत दु:ख व्यक्त केलं आहे. तसेच या प्रकरणी संबंधित पायलटवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती सांगण्यात आली आहे.
प्रवाशाने काय आरोप केले?
पीडित प्रवाशाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर करत म्हटलं की, “एअर इंडिया एक्सप्रेसच्या एका वैमानिक कॅप्टने दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल १ वर माझ्यावर हल्ला केला. मला आणि माझ्या कुटुंबाला कर्मचाऱ्यांनी सुरक्षा तपासणीसाठी पीआरएम चेक वापरण्यास सांगितलं होतं. तेव्हा माझ्यासमोर काही जण रांगेत आले. तेव्हा मला या पायलटने विचारलं की तम्ही अशिक्षित आहेत का? त्यानंतर शाब्दिक वाद वाढला आणि पायलटने माझ्यावर हल्ला केला”, असा आरोप पीडित प्रवाशाने केला आहे.
“या हल्ल्यात मी जखमी झालो आणि रक्तस्त्राव झाला. त्या पायलटच्या शर्टला देखील रक्त लागलं आहे. माझ्या सात वर्षांच्या मुलीसमोर माझ्यावर हा हल्ला करण्यात आला आहे. हे पाहून माझी मुलगी अजूनही धक्क्यात आहे. तिला हल्ल्याबाबत भिती वाटत आहे”, असे आरोप पीडित प्रवाशाने केले आहेत. तसेच विमान कर्मचाऱ्यांचे असे वर्तन योग्य आहे का? असा सवालही त्यांनी विचारला आहे.

पीडित प्रवाशाने म्हटलं की, “माझी सुट्टी वाया गेली आहे. मी आल्यावर सर्वात पहिलं डॉक्टरांची भेट घेतली. माझ्यावर क्रूर हल्ल्याची साक्षीदार माझी सात वर्षांची मुलगी अजूनही धक्क्यात आहे. मला काय करावं हे कळत नाही. डीजीसीए आणि एअर इंडिया अशा वैमानिकांना उड्डाण करण्याची परवानगी कशी देऊ शकतात?”, असं म्हटलं आहे.
एअर इंडियाने निवेदनात काय म्हटलं?
पायलटच्या वर्तनाबद्दल एअर इंडियाने खेद व्यक्त करत अधिकृत निवेदन जारी केलं. एअरलाइनने म्हटलं की, “दिल्ली विमानतळावर घडलेल्या घटनेबद्दल मनापासून खेद व्यक्त करतो. आम्ही पीडितांप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो आणि अशा वर्तनाचा तीव्र निषेध करतो. संबंधित कर्मचाऱ्याला तात्काळ अधिकृतरित्या कामावरून काढून टाकण्यात आलं आहे आणि सखोल चौकशी होईपर्यंत योग्य ती कारवाई केली जाईल. निष्पक्ष आणि सखोल तपास सुनिश्चित करण्यासाठी आम्ही कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करण्यास वचनबद्ध आहोत”, असं एअर इंडियाने निवेदनात म्हटलं आहे.
