आकाशात विमानाच्या उडणाऱ्या मार्गाच्या माध्यमातून जगप्रसिद्ध ‘मोनालिसा’चे चित्र साकारण्याचा अनोखा प्रयोग एका पायलटने केला आहे. लिओनार्डो दा विंची यांच्या जगप्रसिद्ध कलाकृतीची प्रतिकृती तयार करण्यासाठी पायलटने तब्बल चार तास विमान उडवत ठराविक मार्ग आखला. या अनोख्या प्रयोगाचा उड्डाण मार्गाचे दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
उड्डाणाच्या मार्गाने साकारली मोनालिसा
ही घटना १८ सप्टेंबर रोजी शुक्रवारी सकाळी घडली. पायलटने अमेरिकेतील अर्कान्सास येथील बेन्टोनव्हिलमधून छोट्या विमानाने उड्डाण केले. त्यानंतर ओक्लाहोमा आणि अर्कान्सासच्या परिसरातील ठराविक मार्गाने विमान उडवत उड्डाणाच्या हालचालींच्या माध्यमातून ‘मोनालिसा’ची आकृती तयार केली.
‘एअरनाव्ह रडार’ने तयार केलेल्या ‘थ्रीडी’ उड्डाण मार्गाचे दृश्यीकरणात ही आकृती हळूहळू आकार घेताना दिसते. सुरुवातीला काही साध्या रेषा दिसतात, मात्र विमान वेगवेगळ्या दिशेने फिरत राहिल्यानंतर अखेरीस मोनालिसाच्या चेहऱ्याची आणि शरीराची ओळखता येण्याजोगी आकृती तयार होते.
जवळपास चार तास हवेत होतं विमान
विमानाच्या उड्डाणाच्या माहितीनुसार, सेसना आर१८२ स्कायलेन आरजी हे विमान जवळपास चार तास हवेत होते. या काळात पायलटने अत्यंत काळजीपूर्वक विमानाचा मार्ग बदलत संपूर्ण चित्र पूर्ण केले. जमिनीवर ब्रश किंवा पेन्सिलने चित्र काढण्याऐवजी आकाशात विमानाच्या मार्गाने चित्र तयार करण्याचा हा प्रयोग असल्याने सोशल मीडियावर त्याची विशेष चर्चा होत आहे.
पायलटच कलाकारही
हे विमान बेंजामिन मॅकडॅनियल यांच्या नावावर नोंदणीकृत आहे. ते स्वतःला पायलट आणि कलाकार दोन्ही म्हणून ओळखतात. मॅकडॅनियल यापूर्वीही विमानाच्या उड्डाण मार्गाच्या माध्यमातून आकाशात वेगवेगळ्या आकृत्या आणि कलाकृती साकारत आले आहेत. ते त्यांच्या thepilotpicasso या इन्स्टाग्राम अकाउंटवर अशा प्रयोगांचे व्हिज्युअल शेअर करतात.
‘मोनालिसा’ची ही आकाशातील प्रतिकृती समोर आल्यानंतर सोशल मीडिया युजर्सनीही या अनोख्या कलाप्रयोगाची दखल घेतली. हजारो फूट उंचीवर विमानाच्या हालचालींच्या माध्यमातून एवढी गुंतागुंतीची आकृती तयार करण्यासाठी पायलटने आखलेला मार्ग आणि त्यामागची अचूकता यामुळे हा प्रयोग विशेष ठरला आहे.
