एअर इंडियाचं विमान AI 2379 च्या पायलट इन कमांडचा लॅब टेस्ट मारिजुआना रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार हे तेच फुकेत-दिल्ली फ्लाईट आहे जे ४ ऑगस्टला जवळपास ३०० फूट खाली आलं होतं. या घटनेमध्ये १७ प्रवासी आणि क्रू मेंबर्स जखमी झाले होते. आता या विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशाने वैमानिक नशेत असल्याचं दिसत होतं असं म्हटलं आहे.
प्रवाशाने नेमकं काय सांगितलं?
४ ऑगस्टच्या दिवशी मी ज्या एअर इंडियच्या फुकेत दिल्ली विमानाने प्रवास केला, त्यात सुरुवातीलाच हे कळत होतं की पायलट नशेत आहे. जेव्हा विमान ३०० फूट खाली आलं तेव्हा अपघातानंतर आम्हाला हे सांगण्यात आलं की जाऊदेत काही रेकॉर्ड करु नका आम्ही अडचणींत येऊ. विमानात त्या दिवशी प्रवेश करणारे शेवटचे प्रवासी म्हणजे मी आणि माझा भाऊ. आमच्यासोबत विमानाचा वैमानिकही होता. मी त्याच्याशी संवाद साधला. त्याला विचारलं की आपलं विमान वेळेत पोहचेल का कारण आपल्याला थोडासा उशीर झाला आहे. त्यावर त्याचं उत्तर हे अगदीच धीम्या गतीने होतं. त्याला नीट प्रश्न कळला नसावा. शिवाय मी पाहिलं तर त्याचे डोळे लाल झाले होते. मी माझ्या भावालाही ही बाब लक्षात आणून दिली. त्यावर तो मला म्हणाला अरे तो नशेत असं वाटतं आहे. त्यानंतर काय घडलं ते सगळ्यांनाच माहीत आहे असं या प्रवाशाने सांगितलं. या पायलटने गांजा ओढल्याचा अहवाल जेव्हा समोर आला तेव्हा मी माझ्या भावाला फोन केला आणि म्हटलं बघ आपल्याला योग्यच वाटलं होतं पायलट नशेत होता. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.
४ ऑगस्टला घडलेली घटना काय?
एअर इंडियाचं फुकेत-दिल्ली विमान क्रमांक AI2379 हे विमान ३०० फूट खाली आलं होतं. ज्यानंतर १७ प्रवासी आणि क्रू मेंबर जखमी झाले होते. याच विमानाचा मुख्य वैमानिक गांजा पिऊन विमान चालवत होता ही बाब आता समोर आली आहे. कारण या वैमानिकाची मारिजुआना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे. ही घटना घडल्यानंतर दोन्ही वैमानिकांची सायको अॅक्टिव्ह सब्सटेन्स स्क्रिनिंग करण्यात आलं होतं. प्राथमिक तपासात काहीही समोर आलं नाही. पण याबाबतचा विस्तृत अहवाल जेव्हा समोर आला तेव्हा मुख्य वैमानिकाची मारिजुआना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
