पीटीआय, कोची
केरळमचे माजी मुख्यमंत्री आणि माकपचे प्रमुख नेते पिनराई विजयन आणि इतरांच्या विरोधात कथित ‘सीआरएमएल’ लाचखोरी प्रकरणी भ्रष्टाचारविरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, असे निर्देश केरळ उच्च न्यायालयाने शुक्रवारी राज्याच्या दक्षता विभागाला दिले. विजयन यांना हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दिलेल्या माहितीवरून भ्रष्टाचारविरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा झाल्याचे दिसत आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

केरळ उच्च न्यायालयाचे न्या. ए. बद्रुद्दीन म्हणाले की, ‘ईडी’ने दिलेल्या माहितीमध्ये विजयन, त्यांची मुलगी वीणा टी आणि जावई पी.ए. मोहम्मद रियास (विद्यमान माकप आमदार) यांनी भ्रष्टाचारविरोधी कायद्याअंतर्गत दखलपात्र गुन्हा झाल्याचे दर्शवणारे पुरेसे प्राथमिक साहित्य आहे. त्यावरून एफआयआर नोंदवता येईल आणि त्याचा तपास करता येईल, असे मत न्यायालयाने नोंदवले.

उच्च न्यायालयाचा निकाल हा काँग्रेसप्रणित संयुक्त लोकशाही आघाडीच्या सरकारसाठीही धक्का मानला जात आहे. याप्रकरणी ‘ईडी’च्या अहवालाची प्राथमिक चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचा निर्णय बेकायदा असल्याचे न्यायालयाने नमूद केले आणि त्यासंबंधीचा निर्णय रद्द केला.

या प्रकरणातील तथ्ये आणि परिस्थिती पाहता, अधिक चौकशीची गरज नाही. याप्रकरणी आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) कलम ६६(२)अंतर्गत देण्यात आलेल्या माहितीवरून राज्य पोलिसांनी एफआयआर नोंदवणे अपरिहार्य आहे. – केरळ उच्च न्यायालय