2026 Kerala Legislative Assembly election: केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका करत काँग्रेसवर भाजपाला अप्रत्यक्ष मदत केल्याचा आरोप केला आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
“राहुल गांधी ‘बी टीम’सारखे काम करत आहेत”
इंडिया टुडे टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत विजयन म्हणाले की, राहुल गांधी यांची राजकीय भूमिका अनेकदा भाजपाच्या फायद्याची ठरली आहे. “राहुल गांधी प्रभावीपणे भाजपाच्या ‘बी-टीम’सारखे काम करत आहेत. त्यांच्या भूमिकेमुळे भाजपला वारंवार फायदा झाला आहे,” असा आरोप त्यांनी केला.
विजयन यांनी पुढे सांगितले की, काँग्रेसने दिल्ली आणि हरियाणासारख्या राज्यांमध्ये विरोधकांची एकजूट कमकुवत केली. तसेच अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील सरकारबाबतही काँग्रेसने सातत्यपूर्ण पाठिंबा दिला नसल्याचा आरोप त्यांनी केला.
यूडीएफ आणि एलडीएफमध्ये थेट लढत
केरळमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त लोकशाही आघाडी (UDF) आणि डाव्या लोकशाही आघाडी (LDF) यांच्यात थेट लढत पाहायला मिळत आहे. दोन्ही आघाड्या राज्यातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत.
१४० सदस्यीय केरळ विधानसभेत ‘एलडीएफ’कडे ९५ आमदार असून ‘यूडीएफ’कडे ४२ आमदार आहेत. सत्ताधारी ‘एलडीएफ’ मजबूत स्थितीत असला तरी काँग्रेस काही पारंपरिकदृष्ट्या कठीण असलेल्या मतदारसंघांवर लक्ष केंद्रित करत आहे. कन्नूर, बेपोर, एलाथूर आणि कोल्लम या मतदारसंघांमध्ये विशेष चुरस पाहायला मिळणार आहे.
“भाजप एकही जागा जिंकणार नाही”
दरम्यान, विजयन यांनी भाजपाच्या संधीबाबतही भाष्य करत राज्यात भाजपला यश मिळणार नसल्याचा दावा केला. “भाजपा केरळमध्ये एकही जागा जिंकू शकणार नाही. काही प्रमाणात वाढ झाली असली तरी ती विजयासाठी पुरेशी नाही,” असे ते म्हणाले.
तसेच, शबरीमला मंदिरासारखे धार्मिक मुद्दे या निवडणुकीत निर्णायक ठरणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. मतदार विकास आणि राज्याच्या भविष्यास प्राधान्य देत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
केरळचे राजकीय वातावरण स्थिर- विजयन
धार्मिक ध्रुवीकरणाच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना विजयन यांनी केरळमधील राजकीय वातावरण स्थिर असल्याचे सांगितले. मात्र, सत्ताधारी ‘एलडीएफ’विरुद्ध लढण्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफ जातीयवादी शक्तींचा, विशेषतः इंडियन युनियन मुस्लिम लीगचा पाठिंबा घेत असल्याचा आरोप त्यांनी केला.
