केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताला घाम फोडणाऱ्या अमेरिकेच्या क्रिकेट संघाचे कौतुक केले आहे. अमेरिकेच्या संघाने सामना गमवला असला तरी ते उत्कृष्ट खेळल्याचे म्हटले आहे. तसेच अमेरिकेने टॅरिफमध्ये शून्य केले असते तर ते भारताविरुद्धचा टी-२० विश्वचषक सामना जिंकले असते, अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर यांना उद्देशून केली.
सर्जियो गोर यांनी आयोजित केलेल्या एका रिसेप्शनमध्ये गोयल बोलत होते. सर्जियो गोर हे शनिवारी झालेल्या भारत आणि अमेरिका यांच्यातील क्रिकेट सामना पाहण्यासाठी उपस्थित होते.
गोयल नेमकं काय म्हणाले?
“अमेरिकेने सामना (टी-२० वर्ल्डकपमधील क्रिकेट सामना) जिंकला नसेल, पण मला मान्य करावे लागेल की, ज्या देशाला क्रिकेट माहित नव्हते आणि ज्यांनी काही वर्षांपूर्वीच क्रिकेट खेळायला सुरुवात केली आहे, अशा देशाची कामगिरी उत्कृष्ट राहिली. सर्जिओ हे सामन्याचा आनंद घेण्यासाठी उपस्थित होते. सर्जिओ यांनी एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा नमूद केला की, अमेरिका हा सामना १८ टक्क्यांनी हरली. आणि मी त्यांना एक सूचना म्हणून अत्यंत नम्र विनंती केली की, जर तुम्ही तुमचे रेसिप्रोकल टॅरिफ शून्य केले असते, तर कदाचित तुम्ही हा सामना जिंकला असता. अमेरिकन क्रिकेट संघाने केलेल्या या दमदार कामगिरीने मी खरंच आश्चर्यचकित झालो,” असे पीयूष गोयल म्हणाले. दरम्यान यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकल्याचे पाहायला मिळाले.
मॅचमध्ये काय झालं?
टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाने मोनांक पटेल याच्या नेतृत्वाखालील अमेरिकेच्या संघाला २९ धावांनी पराभूत केले. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघाने २० षटकांमध्ये एकूण १६१ धावा केल्या होत्या.
सूर्यकुमार यादवने ४९ चेंडूत १० चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने नाबाद ८४ धावांची खेळी केली. तर इशान किशनने (१६ चेंडूत २० धावा, एक चौकार आणि दोन षटकार) आणि तिलक वर्माने (१६ चेंडूत २५ धावा, तीन चौकार आणि एक षटकार) देखील मोलाचे योगदान दिले.
अमेरिकेच्या संघाने टी२० वर्ल्डकपच्या सलामीच्या लढतीत जेतेपदाचे प्रबळ दावेदार आणि गतविजेत्या भारतीय संघाला १६१ धावांतच रोखल्याने अमेरिकेच्या संघाचे विशेष कौतुक झाले. विशेष म्हणजे एकाक्षणी भारतीय संघाची अवस्था ७७/६ अशी होती. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या झुंजार अर्धशतकी खेळीमुळे भारताने सन्मानजनक धावसंख्या गाठली. झंझावाती फॉर्ममध्ये असणाऱ्या भारतीय संघाला एवढ्या कमी धावात रोखणं हे अमेरिकेचं यश आहे.
