जम्मू-श्रीनगर महामार्ग ठप्पच

तुफान बर्फवृष्टीमुळे शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही काश्मीरचा उर्वरित देशाशी असलेला संपर्क तुटला असून जम्मू-श्रीनगर महामार्ग बंद पडला आहे, तर खराब हवामान आणि दृश्यमानता यामुळे श्रीनगर विमानतळावरील उड्डाणे स्थगित ठेवण्यात आली आहेत.

जम्मू-काश्मीर महामार्ग वाहतुकीसाठी बंदच ठेवण्यात आला असून वाहतूक पूर्ववत सुरू करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. श्रीनगरला येणारी आणि श्रीनगरहून जाणाऱ्या विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आल्याचे भारतीय विमानतळ प्राधिकरणाने म्हटले आहे.

काश्मीर खोऱ्यात गुरुवारी झालेल्या तुफान बर्फवृष्टीमुळे वीज, पाणीपुरवठा अशा आवश्यक सेवा बाधित झाल्या आहेत. बिगरमोसमी बर्फवृष्टीमुळे अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले असून विजेचे खांबही कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.