Colombia Plane Crash : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं २८ जानेवारी रोजी सकाळी विमान अपघातात निधन झालं. बारामतीत विमानाचं लँडिंग होत असतानाच विमानाचा अपघात झाला आणि यामध्ये अजित पवार यांच्यासह सहा जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे.
आता अशाच प्रकारची एक घटना कोलंबियामध्ये देखील घडली आहे. कोलंबियामध्ये भीषण विमान अपघात झाला आहे. या विमान अपघातामध्ये एका कोलंबियन खासदारासह आणखी १५ जणांचा मृत्यू झाला आहे. या विमान अपघाताच्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना बुधवारी व्हेनेझुएलाजवळील प्रदेशात घडल्याची माहिती सांगितली जात आहे.
समोर आलेल्या वृत्तानुसार, हे विमान कोलंबियाच्या सरकारी मालकीच्या एअरलाइन्सचं होतं. या अपघाताच्या घटनेत विमानातील सर्व प्रवासी आणि विमानातील क्रू मेंबर्स यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर विमान चालवणाऱ्या सरकारी मालकीच्या सॅटेना एअरलाईन्सने म्हटलं की, ‘ही घटना ज्या ठिकाणी घडली, तेथील स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी विमान कोसळल्याची माहिती प्रशासनाला दिली असून पुढील कार्यवाही सुरू आहे.’
दरम्यान, विमान अपघाताची घटना नेमकं कशी घडली? याची चौकशी करण्यात येणार आहे. या बरोबरच याच विमानात कोलंबियन संसदेचे सदस्य डायोजेनेस क्विंटेरो हे अपघाताच्या वेळी विमानात होते आणि या घटनेत त्यांचाही मृत्यू झाला. दरम्यान, कोलंबियन मंत्रालयाने एका निवेदनात म्हटलं की, ‘विमान अपघात झाल्यानंतर त्या विमानातील प्रवाशांपैकी दुर्दैवाने कोणीही वाचलं नाही.’
कॅमिलो डाझा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून या विमानाने उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांमध्येच या विमानाचा हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला आणि त्यानंतर ही घटना घडली. अपघात घडला तेव्हा विमानात १३ प्रवासी आणि दोन क्रू मेंबर्स होते. या विमान अपघाताच्या घटनेनंतर कोलंबियाचे अध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शोक व्यक्त केला. “या घटनेमुळे मला खूप दुःख झालं आहे. या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांबरोबर माझ्या संवेदना आहेत”, असं त्यांनी म्हटलं आहे.

