scorecardresearch

“तुमची शिफ्ट संपली, प्लीज घरी जा!” कम्प्युटरवर पॉप-अप पाहून कर्मचारी सुखावले. ‘या’ भारतीय कंपनीची वाहवा!

एकीकडे आपण कामाचे तास संपले तरी दोन ते तीन तास अधिक काम करणारे, उशिरापर्यंत ऑफिसमध्ये थांबून काम संपवणारे कर्मचारी पाहतो. तर दुसऱ्या बाजूला इंदूरमधली एक आयटी कंपनी शिफ्ट संपल्यावर लगेच घरी जा असं कर्मचाऱ्यांना सांगते.

go home IT company pop-up to employees
या कंपनीत शिफ्ट संपल्यावर कर्मचाऱ्यांना घरी जाण्याची विनंती केली जाते. (PC : linkedin/Tanvi Khandelwal)

बऱ्याचदा आपण खासगी कंपन्यांमध्ये पाहतो की, कर्मचाऱ्यांची कामाची वेळ संपली तरी दिलेलं काम पूर्ण करण्यासाठी कर्मचारी ऑफिसमध्ये थांबलेलेच असतात. खासगी कंपन्यांमध्ये वेळेवर काम बंद करून घरी जाणाऱे कर्मचारी थोडेच असतील. कामाच्या वेळेत काम पूर्ण नाही होत अशी तक्रार कर्मचारी आणि कंपन्यांची असते. तर काही कंपन्या जबरदस्तीने कर्मचाऱ्यांना अधिक तास काम करायला भाग पाडतात. परंतु इंदूरमधल्या एका कंपनीने कर्मचाऱ्यांचं वर्क लाईफ बॅलेन्स करण्याचं एक शानदार उदाहरण सादर केलं आहे. ही कंपनी कर्मचाऱ्यांची शिफ्ट (कामाची वेळ) संपायला आल्यावर डेस्कटॉपवर एक नोटिफिकेशन पाठवते. त्यात कर्मचाऱ्यांना घरी जाण्याची विनंती केली जाते.

तन्वी खांडेलवाल या तरुणीने लिंक्डइनवर एक पोस्ट केली आहे. तिची ही पोस्ट व्हायरल होऊ लागली आहे. तिने त्यात सांगितलं आहे की, “शिफ्ट संपायला आल्यावर ऑफिस डेस्कटॉपवर नोटफिकेशन येतं. त्यात लिहिलेलं असतं की, तुमची शिफ्ट संपली आहे. कृपया घरी जा.” लिंक्डइनवर पोस्ट करणारी तरुणी एचआर असून ती सध्या सॉफ्टग्रिड कम्प्युटर या कंपनीत काम करत आहेत.

तन्वीने सांगितलं की, ही काही कंपनीची जाहिरात नाही. हे तिच्या कंपनीतलं वातवरण आहे. तिने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिच्यासमोर असलेल्या कम्प्युटरवर एक पॉप-अप नोटिफिकेशन आलं आहे. त्यात लिहिलं आहे की, “इशारा!!! तुमची शिफ्टची वेळ संपली आहे. ऑफिस सिस्टिम १० मिनिटांत बंद होईल. कृपया घरी जा.” (Warning!!! Your Shift Time Is Over, The office system will shut down in 10 minutes. PLEASE GO HOME.)

कंपनीचं स्तुत्य पाऊल

आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात संतुलन राहावं यासाठी सर्वजण संघर्ष करत असतात. बऱ्याच कंपन्यांनाही असं वाटतं की, त्यांच्या कर्मचाऱ्यांच खासगी आयुष्य आणि काम संतुलित राहावं. त्यासाठी कंपन्या देखील प्रयत्न करत असतात. तन्वीची कंपनी देखील असाच प्रयत्न करत आहे.

हे ही वाचा >> खून करून भिकारी झाला, स्वतःच्या कारने भीक मागायला जायचा, ३ वर्ष पोलिसांना चकमा, ‘असा’ अडकला जाळ्यात

तन्वीने म्हटलं आहे की तिची कंपनी ठरलेल्या वेळेनंतर कर्मचाऱ्यांना घरी जाण्याची आठवण करून देते. यासाठी डेस्कटॉपवर इशारा दिला जातो. यामुळे ऑफिसमध्ये काम करण्याचा आनंद मिळतो असंही तिने सांगितलं. तन्वी म्हणाली, “आमची कंपनी Work Life Balance करण्यावर अधिक भर देते.”

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-02-2023 at 15:15 IST