Donald Trump Praises Indian Election Commission Congress Slams: भारतीय निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीचे कौतुक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले होते. ट्रुथ या सोशल मीडियावर पोस्ट टाकून ट्रम्प यांनी भारतीय निवडणूक आयोगाचे कौतुक केले. त्यानंतर आता काँग्रेसचे नेते पवन खेरा यांनी एक खोचक पोस्ट करत निवडणूक आयोगाचे आयुक्त ज्ञानेश कुमार गुप्ता यांना अमेरिकेत घेऊन जाण्याची विनंती ट्रम्प यांना केली आहे.

पवन खेरा यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. त्यात ते म्हणाले, “प्रिय डोनाल्ड ट्रम्प, कृपया ज्ञानेश कुमार गुप्ता यांना अमेरिकेला घेऊन जा आणि त्यांना तिथेच ठेवा. आम्ही आमचे ईव्हीएमदेखील पुढील विमानाने लगेच पाठवून देऊ.” अमेरिकेकडून आतापर्यंत भारताला दिलेल्या धमक्यांचा उल्लेख करताना पवन खेरा पुढे म्हणाले, “तुम्ही आमचा आजवर जो काही अपमान केला आणि आम्हाला धमकावले, त्याच्याबदल्यात तुमच्यासाठी आम्ही एवढे तरी करू शकतो.”

आपल्या पोस्टच्या शेवटी, ट्रम्प यांनी “टू एसआयआर विथ लव्ह, फ्रॉम इंडिया”, असे म्हटले आहे. यातून त्यांनी निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेचा उल्लेख केला आहे.

डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले होते?

डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथवर केलेल्या पोस्टमध्ये ‘सेव्ह अमेरिका ॲक्ट’ या प्रस्तावित अमेरिकी कायद्यासाठी भारताच्या निवडणूक प्रणालीचा दाखला दिला.

त्यांनी म्हटले, “या महिन्याच्या सुरुवातीला भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आमच्या म्हणजेच अमेरिकेच्या प्रशासनाला विचारले होते की, अमेरिकेत तुम्ही मतदारांना फोटो असलेली ओळखपत्रे का दिलेली नाहीत? त्याशिवाय तुम्ही निवडणुका कशा काय घेता? भारतात २०२४ मध्ये झालेल्या निवडणुकीत ६४ कोटी ६० लाखांहून अधिक मतदारांनी मतदान केले. प्रत्येक मतदाराकडे त्यांचे निवडणूक ओळखपत्र होते. कारण ते असणे अनिवार्य आहे. आता या पार्श्वभूमीवर अमेरिकाही पावले उचलणार आहे.”

काँग्रेसने ज्ञानेश कुमार यांना लक्ष्य का केले?

मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेवरून काँग्रेसने आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयोगावर सुरुवातीपासून टीका केली आहे. २०२५ मध्ये काँग्रेसचे नेते, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदांची मालिका घेऊन निवडणूक आयोगावर थेट व्होट चोरीचा आरोप केला होता. मतदार याद्यांतील अनिमियतता त्यांनी दाखवून दिल्याचा दावा केला होता. तेव्हापासून निवडणूक आयोग विरुद्ध काँग्रेस हा वाद चिघळला होता.