कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आजपर्यंत एकदाही यूपीए सरकारच्या कारभारात ढवळाढवळ केली नसल्याचे कॉंग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्याच हातात सत्तेची सारी सूत्रे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दोन सत्ताकेंद्रे असलेले मॉडेल राज्यकारभारात उपयुक्त नसल्याची प्रतिक्रिया दिग्विजयसिंह यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. त्या संदर्भात स्पष्टीकरण देताना दिग्विजयसिंह यांनी वरील वक्तव्य केले.
सरकार चालविण्यासाठी एकच सत्ताकेंद्र असायला हवे. यूपीए सरकारमध्ये डॉ. सिंग यांच्याकडे हे सत्ताकेंद्र आहे. ज्यावेळी काही राजकीय विषय समोर येतात. त्यावेळी सोनिया गांधी निर्णय घेतात. दोघेही स्वतंत्रपणे आपापल्या कार्यक्षेत्रात काम करतात. असे दिग्विजयसिंह यांनी सांगितले.
माध्यमांमुळे आणि विरोधकांनी केलेल्या अपप्रचारामुळे केंद्रात दोन सत्ताकेंद्रे असल्याचा गैरसमज प्रशासनामध्ये निर्माण झाला असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.