UK PM Keir Starmer slams Donald Trump and Vladimir Putin: अमेरिका आणि इस्रायलने इराणविरोधात पुकारलेले युद्ध आणि रशियाचा युक्रेनशी सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम संपूर्ण जगावर कमी-अधिक प्रमाणात झालेला आहे. इराण युद्धामुळे तर जगाचा इंधन आणि वायू पुरवठा विस्कळीत झाला. भारतात एलपीजी गॅसची टंचाई जाणवली. त्याप्रमाणेच ब्रिटनलाही याचे चटके सहन करावे लागले आहेत. ऊर्जा साधनांच्या सतत बदलणाऱ्या किमतीमुळे आता खुद्द ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर कंटाळले आहेत. त्यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये ट्रम्प आणि पुतिन यांचा वीट आल्याचे म्हटले आहे.

आयटीव्हीच्या रॉबर्ट पेस्टन यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये पंतप्रधान कीर स्टार्मर म्हणाले की, डोनाल्ड ट्रम्प मध्यपूर्वेत जे करत आहेत, त्याचा परिणाम ब्रिटिश जनतेवर होत आहे. ट्रम्प आणि पुतिन यांच्या कृतीमुळे ब्रिटनमधील कुटुंबियांना फटका बसत आहे. त्यांचे इंधनाचे बिल वर-खाली होत आहे. अनेक व्यवसायांचा तोटा होत आहे. त्यामुळे मला यांचा वात आला आहे.

ट्रम्प यांनी सांगूनही ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी ब्रिटिश सैन्य मध्यपूर्वेत पाठवले नाही. यामुळे ट्रम्प यांनी स्टार्मर यांच्यावर कठोर टीका केली. तसेच त्यांची खिल्लीही उडवली होती. तसेच लेबनॉन हा शस्त्रसंधीचा भाग आहे, असे इराणने सांगूनही इस्रायलने लेबनॉनवर हल्ले केले, याबद्दल स्टार्मर यांनी बेंजामिन नेतान्याहू यांच्यावर जाहीर टीका केली आहे.

इस्रायलच्या हल्ल्यांचा निषेध करताना स्टार्मर म्हणाले, “शस्त्रसंधीच्या कराराचे हे उल्लंघन आहे की नाही हा तांत्रिक प्रश्न बाजूला सारून हे हल्ले तात्काळ थांबायला हवे, असे माझे ठाम मत आहे.”

मध्यपूर्वेतील युद्धविरामानंतर होर्मझुच्या सामुद्रधुनीतून पुन्हा एकदा सागरी वाहतूक सुरू करण्याबाबत एक व्यावहारिक योजना तयार करणे गरजेचे आहे, या विषयावर स्टार्मर आणि ट्रम्प यांच्या गुरुवारी चर्चा झाली. ब्रिटन सरकारच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, पंतप्रधान स्टार्मर यांनी कतारमधून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी गुरुवारी संवाद साधला. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून पुन्हा एकदा वाहतूक सुरळीत सुरू करणे आणि त्याबाबत आखाती देशातील नेत्यांशी झालेल्या चर्चेची माहिती ट्रम्प यांना दिली. तसेच एका व्यवहार्य योजनेवर सर्वांना एकत्र आणण्याच्या ब्रिटनच्या प्रयत्नांविषयीही माहिती दिली.

द गार्डियनमध्ये स्टार्मर यांनी एक लेख लिहिला आहे. या लेखात त्यांनी लिहिले की, ब्रिटन असा देश व्हावा जो विदेशातील घडणाऱ्या घटनांच्या दयेवर अवलंबून नसेल, असे मला वाटते. आधीच्या सरकारांनी जागतिक घटनांना प्रतिसाद देताना, संकट हाताळणे, तात्पुरती मलमपट्टी करणे आणि मग परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करणे, इतकाच प्रयत्न केला. पण आमचे सरकार यापेक्षा अधिक काम करत आहे.

इराण युद्धाचा उल्लेख करताना त्यांनी लिहिले की, आताची परिस्थिती पूर्णपणे वेगळी असून एक लक्ष्मणरेषा ओढली गेली आहे. या संकटातून आपण कसे बाहेर पडतो, त्यावरच पुढची पिढी आपले मूल्यांकन करेल.