Eknath Shinde Shiv Sena Telangana Poster: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. पंतप्रधान होण्यापूर्वी नरेंद्र मोदी हे गुजरातचे तीन वेळा मुख्यमंत्री होते. त्यांनी ७ ऑक्टोबर २००१ रोजी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारली होती. पंतप्रधान मोदींनी २५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्याबद्दल भाजपाकडून देशभरात विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे. एनडीएचे घटक पक्षही यात मागे नाहीत. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने तेलंगणात एक अनोखा कार्यक्रम घेतला. ज्यामध्ये पंतप्रधान मोदींना प्रभू श्रीराम तर एकनाथ शिंदेंना हनुमानाच्या अवतारात दाखविले गेले.
एएनआय वृत्तसंस्थेने यासंबंधीचा एक व्हिडीओ एक्सवर शेअर केला आहे. तेलंगणा शिवसेनेच्या वतीने हिमायत नगर येथे उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेनेचे तेलंगणा प्रदेशाध्यक्ष एस. शिवाजी यांनी एका वृत्त संकेतस्थळाशी बोलताना सांगितले की, पंतप्रधान मोदी आणि आमच्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदे हे एकही दिवस सुट्टी न घेता सलग २५ वर्ष देशाची, राज्याची सेवा करत आहेत. पंतप्रधान मोदींनी राष्ट्रसेवेची २५ वर्ष पूर्ण केल्याबद्दल आम्ही उत्सव साजरा करत आहोत.
तेलंगणा शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवतांचे अवतार असल्याचे पोस्टर लावले. या पोस्टरचा दुग्धाभिषेकही करण्यात आला.
या पोस्टरमध्ये पंतप्रधान मोदी प्रभू श्रीराम, अमित शाह हे लक्ष्मण आणि एकनाथ शिंदे हनुमानाच्या अवतारात दाखविले गेले आहेत. या पोस्टरबद्दल माहिती देताना एस. शिवाजी म्हणाले, “एकनाथ शिंदेंनी आम्हाला हा उत्सव साजरा करण्याचे निर्देश दिले होते. पुराणात ज्या युगांचा उल्लेख आहे, त्या प्रत्येक युगात अनेक देवांचा अवतार आपल्याला पाहायला मिळतो.” हे सांगून शिवाजी यांनी प्रत्येक युगाचे नाव आणि त्यात उल्लेख असलेल्या अवतारांचे नाव सांगितले.
यानंतर एस. शिवाजी म्हणाले की, कलियुगात प्रभू श्रीरामाच्या रुपात आपण पंतप्रधान मोदींना पाहू शकतो. या रामाबरोबर प्रत्येक ठिकाणी संघर्ष करणाऱ्या लक्ष्मणच्या रुपात आपण अमित शाह यांना पाहू शकतो.

एकनाथ शिंदे काय म्हणाले?
दरम्यान बुधवारी एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या वाटचालीबद्दल त्यांचे अभिनंदन केले. नरेंद्र मोदी यांच्या २५ वर्षांच्या सार्वजनिक जीवनाचा हा टप्पा केवळ एका नेत्याच्या राजकीय कारकिर्दीचा गौरव नाही. भारताच्या बदलत्या राजकीय, सामाजिक आणि विकासात्मक प्रवासाचे प्रतिबिंब असल्याचे शिंदे यांनी सांगितले. महाराष्ट्रातील १३ कोटी जनता आणि शिवसेनेच्या वतीने त्यांनी मोदी यांना शुभेच्छा दिल्या.
