नवी दिल्ली : काँग्रेस आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी राष्ट्रीय गीताचे तुकडे केल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसभेत ‘वंदे मातरम’वरील विशेष चर्चेत केला. १९३७ मध्ये मुस्लीम लीगपुढे वाकून नेहरूंनी ‘वंदे मातरम’मधील प्रमुख ओळी वगळल्या. मुस्लिमांच्या भावना भडकू शकतील, असे नेहरूंचे म्हणणे होते. नेहरूंच्या या विचारांमध्ये देशाच्या फाळणीची बीजे रोवली गेली. तेव्हापासून काँग्रेसने तुष्टीकरणाचे राजकारण सुरू केले, असा दावा मोदींनी दीड तासांच्या भाषणामध्ये केला.

‘वंदे मातरम’ला दीडशे वर्षे झाल्यानिमित्त लोकसभेत सोमवारी दिवसभर चर्चा आयोजित करण्यात आली. या चर्चेची सुरुवात करताना मोदींनी, ‘वंदे मातरम’ची १५० वर्षे साजरी करत असताना नव्या पिढ्यांना हा विश्वासघात कोणत्या परिस्थितीमुळे झाला याची माहिती देणे आपले कर्तव्य आहे, असा मुद्दा मांडला. ‘वंदे मातरम’च्या निमित्ताने नेहरू व जीनांमुळे सांप्रदायिकतेला खतपाणी घातले गेल्याचाही आरोप त्यांनी केला.

मोदी म्हणाले की, मुस्लीम लीगने ‘वंदे मातरम’ला विरोध केला. १५ ऑक्टोबर १९३७ रोजी मोहम्मद अली जीना यांनी लखनौमधून ‘वंदे मातरम’विरोधात घोषणाबाजी केली. मुस्लीम लीगच्या विरोधाचा निषेध करून ठामपणे उत्तर देण्याऐवजी तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष नेहरूंनी ‘वंदे मातरम’वरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जीनांच्या विरोधानंतर फक्त पाच दिवसांनी, २० ऑक्टोबरला नेहरूंनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना पत्र लिहून जीनांच्या भावनांशी सहमती दर्शविली. ‘वंदे मातरम’ची ‘आनंद मठ’ कादंबरीतील पार्श्वभूमी मुस्लिमांच्या भावना भडकवू शकते. त्यानंतर काँग्रेसने २६ ऑक्टोबरला कलकत्त्यामध्ये काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत ‘वंदे मातरम’चा आढावा घेऊ असे सांगितले. त्यांनी आढाव्यासाठी बंकिमबाबूंचे बंगाल आणि कलकत्ता शहर निवडले. काँग्रेसच्या प्रस्तावामुळे देशाला धक्का बसला. देशभक्तांनी सकाळच्या मिरवणुका काढून, ‘वंदे मातरम’ गाऊन या प्रस्तावाला विरोध केला. २६ ऑक्टोबरला काँग्रेसने ‘वंदे मातरम’शी तडजोड केली. ‘वंदे मातरम’चे तुकडे केले. हा निर्णय सामाजिक सौहार्दाच्या नावाखाली लपवण्यात आला. पण इतिहास साक्षीदार आहे की, काँग्रेसने मुस्लीम लीगसमोर झुकून त्यांच्या दबावाखाली हा निर्णय घेतला, तुष्टीकरणाचे राजकारण केले, अशी टीका मोदींनी केली.

जेव्हा जेव्हा भारतावर संकट आले, तेव्हा देश ‘वंदे मातरम’च्या भावनेने पुढे गेला. जेव्हा जेव्हा देशावर युद्धे लादली गेली, तेव्हा ‘वंदे मातरम’च्या भावनेने सैनिकांना सीमेवर खंबीरपणे उभे राहण्यास भाग पाडले आणि भारतमातेचा ध्वज विजयी होत राहिला. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

दिशाभूल करण्याचा प्रयत्न प्रियंका गांधी

‘वंदे मातरम’वरून पंडित जवाहरलाल नेहरू आणि काँग्रेसवर पंतप्रधान मोदींनी केलेले सर्व आरोप काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी-वढेरा यांनी खोडून काढले. मोदी अपूर्ण माहिती देतात, तथ्यांना वगळून आरोप करतात. निवडक प्रसंग, विधानांचा वापर करून मोदी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात, असा आरोपही प्रियंका यांनी केला. नेहरू आणि नेताजी बोस यांच्या तसेच, नेहरू व रवींद्रनाथ टागोर यांच्यामधील पत्रव्यवहारातील संबंधित उतारे प्रियंका यांनी वाचून दाखवले. ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रीय गीत म्हणून निवडण्यामागील घटनांचा कालक्रम समजून घेतला पाहिजे, असे त्या म्हणाल्या.